रावेर पोलीसांची कामगिरी
रावेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील कुसुंबा ते लालमाती रस्त्यावरील जल्लारशा बाबाच्या दर्ग्याजवळ गावठी पिस्तूल व मॅगझीन विक्रीसाठी आणलेल्या संशयित आरोपीला जळगाव स्थानिक गुन्हे शाखा आणि रावेर पोलिसांनी कारवाई करत बुधवारी २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता अटक केली आहे. त्याच्याकडून २२ हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल आणि दोन मॅगझीन जप्त करण्यात आले आहे.
अब्दुल अनिस अब्दुल मज्जित (वय-४६, रा.मुस्लिम कॉलनी, भुसावळ) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. रावेर तालुक्यातील कुसुंबा ते लालमाती रस्त्यावरील जल्लारशाह बाबाच्या दर्ग्याजवळ एक जण गावठी पिस्तूल विक्रीसाठी येत असल्याची गोपनीय माहिती रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पथकातील पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील, सचिन घुगे, प्रमोद पाटील, विशाल पाटील, महेश मोगरे तसेच जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे विष्णू बऱ्हाटे, विनोद पाटील, ईश्वर देशमुख, राहुल महाजन यांनी बुधवारी २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता कारवाई करत संशयित आरोपी अब्दुल अनिस अब्दुल मज्जिद याला अटक केली. त्याच्याकडून गावठी बनावटीचा पिस्तूल आणि दोन मॅगझीन असा एकूण २२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील करीत आहे.