जळगाव तालुक्यात शिरसोली ते दापोरा दरम्यान घटना, पशूमालकाचे लाखाचे नुकसान
जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील शिरसोली ते दापोरा रस्त्यावर चारण्यासाठी गेलेल्या एका गाभण असलेल्या म्हशीला विजेच्या खांब्याला असणाऱ्या जाड तारामध्ये विद्युत प्रवाह उतरल्यामुळे विजेचा जोरदार धक्का बसून ती जागीच मृत्युमुखी पडल्याची शुक्रवारी दि. १ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.
शेख रऊफ शेख मुजाहिद (वय ५९, रा. शिरसोली ता. जळगाव) हे माजी ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यांच्याकडे ९० हजार रुपयांची गाभण म्हैस आहे. शुक्रवारी दि. १ ऑगस्ट रोजी ते सकाळी काही म्हशी चरण्यासाठी दापोरा रस्त्यावर घेऊन गेले होते. चरताना एका विजेच्या खांब्याजवळ एक गाभण असलेली म्हैस पोहोचली. तेथे जाड तारामध्ये उच्च विद्युत प्रवाह उतरला असल्याने म्हशीला त्याचा स्पर्श झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे पशुपालक शेख रऊफ हे हादरले. त्यांनी पोलिसांसह पशुवैद्यकांना बोलाविले.
शासकीय रुग्णालयातील पशुवैद्यकांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. तर एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी माहिती घेऊन नोंद केली आहे. दरम्यान, पशुपालकाच्या नुकसानीबद्दल त्यांना भरपाई मिळायला हवी अशी मागणी शिरसोलीच्या ग्रामस्थांनी केली आहे. तर पावसाळ्याच्या दिवसात महावितरणने विद्युत खांब्यांची तपासणी करून घ्यावी अशीहि मागणी ग्रामस्थांनी केली आहे.