अमळनेर तालुक्यात मठगव्हाण येथील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील मठगव्हाण येथे पाण्याच्या मोटारीला पिन लावत असताना विजेचा धक्का लागून एका महिलेचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवार, ६ ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
लताबाई भाऊसाहेब पाटील (वय ३९) असे मृत महिलेचे नाव आहे. मठगव्हाण येथे परिवारासह त्या राहत होत्या. लताबाई पाटील या घराच्या मागील बाजूस असलेल्या पाण्याच्या मोटारीला पिन लावण्यासाठी गेल्या होत्या. त्याचवेळी त्यांना अचानक विजेचा जोरदार धक्का बसला आणि त्या जागीच कोसळल्या. हा प्रकार निदर्शनास येताच कुटुंबीयांनी त्यांना तातडीने पातोंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र, तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारांसाठी अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला.
लताबाईंना ग्रामीण रुग्णालयात आणले असता, तेथील डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. या घटनेने मठगव्हाण गावात हळहळ व्यक्त होत आहे. तारकेश्वर गांगुर्डे यांनी दिलेल्या खबरीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोहेकॉ विजय भोई करत आहेत.