चोपडा तालुक्यातील वढोदा येथील घटना
चोपडा (प्रतिनिधी) : शेतातील लोकल लाईनचा तार जोडण्यास गेले असता तालुक्यातील वढोदा येथील २४ वर्षीय तरुणाचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दि. २९ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दीपक तुकाराम पाटील (वय २४, रा. वढोदा ता. चोपडा) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे.(केसीएन)त्याचे वडील तुकाराम पाटील व आई छोटाबाई पाटील हे शेत मजूरी करून आपला उदरनिर्वाह करत होते. तर त्यांचा एकुलता एक मुलगा दीपक याने उच्च शिक्षण घेत तो गावातील शेत पंपाच्या दुरुस्तीचे काम करत होता. वढोदा येथील रहिवासी व सनपुले येथील आश्रम शाळेचे शिक्षक ज्ञानेश्वर गोरख पाटील यांच्या वढोदा शिवारात शेतातील शेत पंपाचा वीज पुरवठा खंडीत झाला होता. तो सुरळीत करण्यासाठी ज्ञानेश्वर पाटील हे दीपक पाटील यांना शेतात घेऊन गेले.
या वेळी दीपक वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी विजेच्या खांबावर चढला असता त्याला जबर शॉक लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दि. २९ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली.(केसीएन)त्यानंतर नातेवाईकांनी दीपकला चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, पण डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. मनमिळाऊ दीपकचा दुर्दैवी अंत झाल्याने पाटील परिवाराला धक्का बसला आहे. या घटनेमुळे वढोदा गावावर शोककळा पसरली आहे. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.