जामनेर तालुक्यातील पळासखेडे येथील घटना
जामनेर ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील पळासखेडे बुद्रुक येथे शुक्रवारी दि. २६ दुपारी साडेबारा वाजता शेतात फवारणी करत असताना विजेचा जबर धक्का बसून अमोल भास्कर सपाटे (वय ३४) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अमोल सपाटे यांनी गावातीलच एका शेतकऱ्याचे शेत निम्मे बटाईने घेतले असून तेथे कापसाची लागवड केली आहे. शुक्रवारी नेहमीप्रमाणे ते तणनाशक औषधाची फवारणी करण्यासाठी शेतात गेले होते. फवारणीचा पंप भरण्यासाठी ते विहिरीजवळ आले. तेथे विजेचा धक्का बसल्याने ते कोसळले. दरम्यान, शेजारच्या शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याने ही घटना पाहून तत्काळ धाव घेतली आणि डिपीजवळ जाऊन वीजपुरवठा खंडित केला.
आजूबाजूच्या शेतकऱ्यांना बोलावून अमोल सपाटे यांना तातडीने जामनेर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना मृत घोषित केले. अमोल सपाटे यांच्या पश्चात आई, पत्नी, मोठा भाऊ, बहिणींसह दोन मुली व मुलगा असा परिवार आहे. या प्रकरणी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पो.हे.कॉ. दीपक जाधव करीत आहेत.









