एरंडोल शहरात महात्मा फुले यांच्या पुतळ्याजवळ घडली घटना
एरंडोल (प्रतिनिधी) : महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त लावण्यात आलेल्या मंडपास अचानक लागलेली आग विझवताना ३२ वर्षीय युवकाचा विजेचा जबर धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास शहरातील महात्मा फुले पुतळ्याजवळ घडली. याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पंकज गोरख महाजन (वय-३२) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याचे पश्चात आई,वडील,पत्नी व तीन मुली असा परिवार आहे. (केसीएन) शुक्रवारी शहरातील महात्मा फुले पुतळ्याजवळ जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा फुले युवा क्रांती मंचच्या पदाधिका-यांसह विविध संघटनांचे पदाधिकारी व आयोजन समितीचे सदस्य कार्यक्रमाची पूर्वतयारी व नियोजन करीत होते. कार्यक्रमानिमित्त पुतळा परिसरात मंडप उभारण्यात आला होता.शुक्रवारी मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास मंडपास अचानक आग लागली. तेथे उपस्थित असलेल्या युवकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मंडपाला लागलेली आग विझवत असतांना पंकज गोरख महाजन याचा विजेच्या खांबास स्पर्श झाल्याने तो खाली पडला.
पंकज महाजन यास ग्रामीण रुग्णालयात नेले असता तो मयत झाल्याचे वैद्यकीय अधिका-यांनी तपासून सांगितले. याबाबत विजय महाजन यांनी दिलेल्या खबरीवरून एरंडोल पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.(केसीएन)पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार विलास पाटील तपास करीत आहेत. दरम्यान जयंती उत्सव कार्यक्रमात सक्रीय सहभाग घेणा-या युवा सहका-याचा अचानक मृत्यू झाल्याने महात्मा फुले जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेले सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले.