भुसावळ तालुक्यातील वराडसीम येथील घटना
भुसावळ (प्रतिनिधी):- पतंग उडवताना विजेच्या खांबावर अडकलेली पतंग काढण्याच्या नादात एका १० वर्षीय बालकाला आपला जीव गमवावा लागल्याची हृदयद्रावक घटना भुसावळ तालुक्यातील वराडसीम येथे घडली आहे. नितीन बिसन बारेला (वय १०) असे मृत बालकाचे नाव आहे.

नितीन बारेला हा मुलगा २३ जानेवारी रोजी वऱ्हाडसीम शिवारात पतंग उडवत होता. यादरम्यान त्याची पतंग एका विजेच्या खांबावर अडकली. अडकलेली पतंग काढण्यासाठी तो खांबावर चढला असता, त्याला विजेच्या जिवंत तारांचा जोरदार धक्का लागला. या अपघातात तो गंभीररीत्या भाजला गेला होता. घटनेनंतर त्याला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. गेल्या सहा दिवसांपासून त्याची मृत्यूशी झुंज सुरू होती. मात्र, उपचार सुरू असतानाच २९ जानेवारी रोजी सकाळी ९:१० वाजता त्याची प्राणज्योत मालवली. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे.
या प्रकरणी जळगाव शहर पोलीस स्थानकातून प्राप्त कागदपत्रांच्या आधारे भुसावळ तालुका पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संजय कंखरे करत आहेत.
या घटनेमुळे वराडसिम परिसरात शोककळा पसरली असून, पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष देण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.









