चाळीसगाव तालुक्यात बेलदारवाडी शिवारात घटना
चाळीसगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील बेलदारवाडी येथील शेतकरी विनोद बन्सीलाल कुमावत यांच्या शेताजवळील डोंगरी नदीकाठावर दुर्दैवी घटनेत दोन म्हशींचा व २ पारडूंचा मृत्यू झाला. याबाबत राजू बाबुराव कुमावत यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात माहिती दिल्यावरून नोंद करण्यात आली आहे.
दि. १५ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता बेलदारवाडीतील सिद्धेश्वर आश्रमाजवळील शिवारात त्यांच्या मालकीच्या जवळपास १ लाख ८० हजारांच्या दोन म्हशी तसेच ६० हजारांचे दोन पारडू चरत होते. या वेळी एमएसईबीची एल.टी. वीज वाहिनी तुटून रस्त्यावर पडली होती. या तारेतून विद्युत प्रवाह सुरू असल्याने २ म्हशी व पारडूंचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पंच व स्थानिकांच्या उपस्थितीत घटनास्थळी पंचनामा करण्यात आला. या घटनेमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून वीज वितरण कंपनीने तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. तपास पो.नि. शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनात रवींद्र रावते करत आहेत.