धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) – धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे वाढदिवसाचे बॅनर काढण्यासाठी गेलेल्या एका इसमाला विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने जोरदार धक्का बसला. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दि. १० जून रोजी दुपारी २ ते ३ वाजेच्या सुमारास घडली आहे. त्याचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आल्यावर कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.
संजय दगा पाटील (वय ५१, रा. ह.मु. कांचन नगर, जळगाव, मूळ रा. वाकडी ता. चाळीसगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. संजय पाटील हे मनोज ग्राफिक्स यांच्याकडे गेल्या १० पेक्षा अधिक वर्षांपासून काम करीत आहेत. शनिवारी संजय पाटील हे सहकारी कमलप्रसाद मुरलीधर पंडित आणि चालक राठोड यांच्यासह पाळधी येथे वाढदिवसाचे बॅनर काढण्यासाठी गेले होते. तेथे बॅनर काढत असताना त्यांना अचानक विजेच्या तारेचा स्पर्श झाला. त्यामुळे विजेचा जोरदार धक्का बसून ते खाली पडले.
त्यांना सहकाऱ्यांनी तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी आणले असता तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. रेणूका भंगाळे यांनी त्यास मयत घोषित केले. त्यांच्या मृत्यूची वार्ता कळताच कुटुंबीयांनी रुग्णालयात धाव घेऊन आक्रोश केला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्यासह नातेवाईक, मित्रांची गर्दी झाली होती. मयत संजय पाटील यांचे पश्चात पत्नी, १ मुलगा, आई, वडील असा परिवार आहे. घटनेची पाळधी पोलीस स्टेशनला नोंद करण्याचे काम सुरु होते.