महावितरण कंपनीकडून कार्यवाही
जळगाव (प्रतिनिधी) : मार्च अखेरच्या पार्श्वभूमीवर महावितरणच्या वीज ग्राहकांकडील थकीत व चालू महिन्याच्या वीजबिल वसुलीसाठी विविध स्तरावरुन सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. ग्राहकांच्या जागृतीसाठी माहिती प्रसारणाच्या नवमाध्यमांसह हलगी, दवंडी आणि भोंगा वाजविण्याच्या जून्या पारंपरिक साधनांचाही प्रभाविपणे वापर करण्यात येत आहे.
जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात महावितरणची वीजबिलांची थकबाकी मोठी आहे. त्याच्या वसुलीसाठी महावितरणतर्फे एसएमएस, कायदेशीर नोटीसा, मुद्रीत व ईलेक्ट्रॉनिकसह सोशल मिडियातून माहिती आणि आवाहने करण्यात येत आहेत. शिवाय शहरी व ग्रामीण भागातून दवंडी, हलगी, भोंगे वाजवून ग्राहकांना वीजबिल भरण्यासंदर्भात आवाहन करण्यात येत आहे. आदिवासी भागातही त्या त्या स्थानिक बोली भाषेतून ग्राहकांना आवाहन करण्यात येत आहे. विविध माध्यमांतून करण्यात येणारी ग्राहक जागृती हीच आवश्यकतेनूसार थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्याची सुचना समजण्यात यावी व महावितरणच्या वीजबिल वसूलीला ग्राहकांनी बिल भरणा करुन सहकार्य करावे. असेही आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.