पाचोरा तालुक्यातील लोहारी येथील घटना
पाचोरा (प्रतिनिधी) : – तालुक्यात शुक्रवारी सांयकाळपासून वादळीवाऱ्यासह पावसाला जोरदार सुरुवात झाली होती. याच पावसात लोहारी गावाजवळ शेतात वीज पडून १४ वर्षीय बालक व एका शेळीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरु होते.
लोहारी गावाजवळ असलेल्या अनिल पाटील यांच्या शेतामध्ये शिवराम सिताराम शिंगाडे, त्यांची पत्नी मंगलाताई शिवराम शिंगाडे व त्यांचा मुलगा गोरखनाथ (रा. पिंप्राळा ता. नांदगाव जि. नाशिक) हे धनगर समाजाचे कुटुंब मेंढरं घेऊन मुक्कामाला होते. सायंकाळ पासून सुरु असलेल्या वादळीवाऱ्यासह पावसाने रात्री उग्र रुप धारण केले व वीजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. याच वेळी आपल्या मेंढ्यांच्या वाड्याजवळ बनवलेल्या कुपीमध्ये एका बाजूला शिवराम सिताराम शिंगाडे व त्यांची पत्नी तर दुसऱ्या बाजूला यांचा मुलगा गोरखनाथ शिवराम शिंगाडे वय वर्षे (१४) हा पाण्यापासून बचाव करत बसलेला होता.
नेमके याचवेळी रात्री साडे ९ वाजेच्या सुमारास अचानकपणे वीजेच्या कडकडाटासह पावसात मोठा आवाज झाला व वीज थेट गोरखनाथ शिवराम शिंगाडे यांच्या अंगावर पडल्याने त्याचा व जवळच असलेल्या एका शेळीचा जागीच मृत्यू झाला. ही बाब लक्षात आल्यावर शिंगाडे कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. लोहारी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली व धनगर कुटुंबीयांना धीर दिला. तसेच सकाळी मयत गोरखनाथ याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला.