जळगाव (प्रतिनिधी) – वीज कोसळून मयत झालेल्या महिलेच्या वारसांना व जखमी झालेल्या दोघांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते नैसर्गिक आपत्ती अंतर्गत मंजूर सानुग्रह अनुदानाचे वाटप करण्यात आले.
मौजे विटनेर येथे दिनांक २७ सप्टेंबररोजी वीज पडून सोनिया राजेंद्र बारेला (भिल) मयत झाल्या होत्या. म्हसावद येथे वीज पडून राहुल माधवराव पाटील व कुणाल माधवराव पाटील जखमी झाले होते.
राज्य शासनाच्या नैसर्गिक आपत्ती अंतर्गत मंजूर सानुग्रह अनुदानाचे वाटप पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. सोनिया बारेला यांच्या वारसांना ४ लक्ष तर जखमी राहुल पाटील व कुणाल पाटील यांना प्रत्येकी चार हजार तीनशे रूपयांच्या अनुदानाचे वाटप ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रांताधिकारी सुधाळकर, तहसीलदार नामदेव पाटील, शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण आदींची उपस्थिती होती.