लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची यावल तालुक्यातील पाडळसे येथे कारवाई
भुसावळ (प्रतिनिधी) :- तक्रारदाराने जुन्या वीज मीटरमध्ये फॉल्ट केला आहे असे भासवून सकारात्मक अहवाल देण्याच्या मोबदल्यात तडजोडीअंती ४ हजारांची लाच स्वीकारताना सावदा विभागाच्या महिला सहायक अभियंत्यांसह लाईनमन, तंत्रज्ञ यांच्यावर लाच घेतल्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. फैजपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
तक्रारदार हे हॉटेल व्यवसायिक आहेत. त्यांच्या हॉटेलवर लावलेले जुने मीटर काढून नवीन मीटर लावून, तक्रारदार यांनी जुन्या मीटरमध्ये फॉल्ट केला आहे असे संशयित आरोपींनी भासविले. (केसीएन)बदल्यात सकारात्मक अहवाल देण्यासाठी २० हजार व १५ हजाराची मागणी करीत तडजोडीअंती ४ हजारांची लाच स्वीकारताना महिला सहाय्यक अभियंता कविता भरत सोनवणे (वय ४२, रा. हुडको कॉलनी,भुसावळ), लाईनमन संतोष सुखदेव इंगळे (वय ४५, रा. मल्हार कॉलनी, फैजपूर) आणि वरिष्ठ तंत्रज्ञ कुणाल अनिल चौधरी (वय ३९ रा. अयोध्या नगर, भुसावळ) यांना लाच घेतल्याप्रकरणी पकडण्यात आले आहे.
गुरुवारी दिनांक १९ दुपारी २ वाजेच्या सुमारास पाडळसे ता.यावल येथे ही कारवाई करण्यात आली. जळगाव पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव, पीएसआय दिनेशसिंग पाटील, नाईक किशोर महाजन, कॉन्स्टेबल राकेश दुसाने यांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे महावितरण विभागासह जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.