जळगावात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
जळगाव ( प्रतिनिधी ) – एका डॉक्टरांच्या मुलाच्या नावाने नविन वीज मीटर बसवण्यासाठी चार हजार रुपये घेतले. तरीही मीटर बसवले नाही. त्यानंतर पुन्हा साहेबांसाठी दोन हजार लाच स्वीकारताना माहवितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला जळगावात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी रंगेहात पकडले.
तक्रारदार डॉक्टर यांना त्यांच्या मुलाच्या नावाने नवीन वीज मीटर घ्यायचे होते. त्यासाठी त्यांनी महावितरणच्या शहर उपविभागाचे वरिष्ठ तंत्रज्ञ आत्माराम धना लोंढे (क्य ५७) यांना कोणकोणते कागदपत्र लागतील? याची विचारणा केली असता त्याने नवीन वीज मीटर बसवण्यासाठी चार हजार रुपयांची मागणी केली होती. लोढेच्या म्हणण्यानुसार चार हजार दिले.
ते देऊनही लोंढेने वीज मीटर बसवले नाही. त्यामुळे त्याला विचारणा केली असता त्याने साहेबांसाठी दोन हजार रुपये द्यावे लागतील असे सांगून आणखी दोन हजारांची मागणी केली. त्याबाबत तक्रारदाराने सोमवारी एसीबीकडे तक्रार केली. त्यावरुन एसीबीच्या पोलिस निरीक्षक स्मीता नवघरे, कॉनस्टेबल सचिन चाटे, अमोल सूर्यवंशी यांच्यासह सापळा रचून पंचासमक्ष वायरमन लोंढे याला दोन हजारांची लाचेची मागणी करताना व ती रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले. जिल्हापेठ पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्या कलमान्वये गुन्हा दाखल करुन लोंढेला अटक केली आहे.









