· शासकीय कार्यालयाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात यावा
· महावितरणचा ‘मार्चअखेर’ 20 मार्च पर्यंतच संपविण्यावर भर
· अभय योजनेचा लाभ देण्याचे आवाहन
जळगाव (प्रतिनिधी ) :- ग्राहकांना अधिकाधिक चांगल्या वीजसेवा देण्यासाठी महावितरणला महसुल हीच सर्वाधिक महत्त्वाची आणि प्राधान्याची बाब आहे. त्यामुळे मार्चअखेरच्या पार्श्वभूमीवर महावितरण मुख्यालयाने ठरवून दिलेल्या नियोजनानुसार 20 मार्चपर्यंत सर्व वित्तीय कामे संपवून चालू महिन्याच्या वीजबिलासह संपूर्ण थकबाकी वसुल करावी असे स्पष्ट निर्देश महावितरणचे कार्यकारी संचालक धनंजय औंढेकर यांनी शुक्रवारी (दि.14 फेब्रवारी 2025) झालेल्या आढावा बैठकीत दिले. श्री औंढेकर यांच्याकडे जळगाव परिमंडलाचे पालकत्व आहे.
महावितरणाच्या जळगाव परिमंडल कार्यालयात 14 फेब्रुवारी रोजी जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील तांत्रिक आणि वित्त व लेखा विभागाच्या अधिकारी आणि कर्माचाऱ्यांची आढावा बैठक झाली. बैठकीस जळगावचे मुख्य अभियंता श्री आय.ए.मुलाणी, जळगावचे अधीक्षक अभियंता सर्व श्री अनिल महाजन, धुळ्याचे निरज वैरागडे, नंदुबारचे अनिल बोरसे यांच्यासह सर्व कार्यकारी अभियंते, अतिरिक्त कार्यकारी अभियंते, वित्त विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक व लेखापाल उपस्थित होते.
पुढे बोलतांना कार्यकारी संचाकल श्री औंढेकर म्हणाले की, अधिक वीजहानी असणाऱ्या वीज वाहिन्यांवर बऱ्याच ठिकाणी प्रामाणीक ग्राहकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत. तशा वाहिन्यांवर अनाधिकृतपणे वीजवापरणाऱ्यांवर वीज चोरीच्या कारवाया सातत्याने करण्यात याव्यात, तसेच करण्यात आलेल्या वीजचोरीच्या कारवायात आर्थिक दंड आणि वीजबिल वापराच्या बिलांची वसुली नियमानुसार करावी. वीजबिल वसुलीचे काम सातत्यापूर्वक करण्यात यावे. वसुलीकामात चालू बिलांसह संपूर्ण थकबाकी वसुलीवर प्राधान्याने लक्ष देण्याच्या सुचना दिल्या.
ग्राहक जागृतीसाठी आवश्यकतेनुसार आवाहन म्हणून वीजबिल भरण्यासाठी भौंगे वाजविणे, नोटीस देणे व शासकीय कार्यालयांकडे वारंवार पाठपुरावा करण्यासंबंधीही अगदी नियोजनबध्द कार्यक्रमच श्री औंढेकर यांनी बैठकीत समाजावून सांगितला.
प्रभावी वीजबिल वसुलीसाठी वापरलेल्या विजेचे वेळेत बिलिंग व त्याची देय तारखेच्या आतच वसुली यावरही त्यांनी बैठकीत भर दिला. बिलासंदर्भात ग्राहकांच्या तक्रारीचा तातडीने निपटारा करण्याबाबतही अधिकाऱ्यांना कळविण्यात आले.
जळगावसह धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात काही ग्राहकांनी अनेक महिने, वर्षापासून वीजबिल भरलेले नसल्याच्या मुद्याकडे कार्यकारी संचालक धनंजय औंढेकर यांनी लक्ष वेधले. तशा ग्राहकांवर तत्काळ कारवाई करण्याच्या सुचनाही केल्या. त्या सोबतच राज्यात कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडित असणाऱ्या ग्राहकांना वरदान ठरणारी ‘महावितरण अभय योजना-24’ राबविण्यात येत आहे. ही योजना 31 मार्च 2025 पर्यंत सुरु आहे. त्याचाही लाभ संबंधिताना देण्याचे त्यांनी आवाहन केले. वीज नियामक आयोगाच्या सुचनांनुसार विजेची थकबाकी कधीही चुकणार नाही. थकीत वीजबिलापोटी खंडित वीज जोडणी असणाऱ्या ठिकाणचा मालक जरी बदलला असला तरी सद्यस्थितीतील जागा मालकास त्या जागेवरील विजेचे बिल भरणे बंधनकारकच आहे. त्यामुळे त्या योजनेचा लाभ ग्राहकानीही पुढाकार घेऊन घ्यावा. असेही आवाहन श्री औंढेकर यांनी बैठकीतून केले.
बैठकीत औंढेकर यांनी सर्व अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना त्यांच्या पदानुसार कामाच्या जबाबदाऱ्या सोपविल्याने बैठकीतील उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही लक्षपूर्तीचे आश्वासन दिले.
कॅप्शन – जळगाव परिमंडलाचे पालकत्व स्वीकारलेले कार्यकारी संचालक धनंजय औंढेकर यांचे परिमंडल कार्यालयात स्वागत करताना मुख्य अभियंता आय.ए.मुलाणी व इतर अधीकारी छायाचित्रात दिसत आहेत.