कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) : – विहिरीजवळ काम करत असतांना अचानक तोल गेल्याने विहिरीत पडून एका तरूणाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी १७ जुलै रोजी रात्री ८.३० वाजता घडली आहे. पाळधी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्यात आली आहे.
किशोर अशोक पाटील (वय २३ रा. टाकरखेडा ता.एरंडोल)असे मयत तरूणाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील आणि दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. किशोर कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठातील पाणीपुरवठा विभागात कामाला होता. नेहमीप्रमाणे गुरूवारी १७ जुलै रोजी सायंकाळी त्याचा सहकारी प्रदीप सोनवणे सोबत पाणीपुरवठा कामानिमित्त विहीरीजवळ गेला होता. विहिरीजवळ काम असतांना अचानक त्याचा तोल गेल्याने तो विहिरीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला.
ही घटना सहकारी प्रदीप याच्या लक्षात येताच त्याने पाळधी येथील पोलीसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. पोलीसांनी घटनास्थळी येवून काही तरूणांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. यावेळी एकुलता एक मुलगा गेल्याने नातेवाईकांनी आक्रोश केल्याचे पहायला मिळाले. शुक्रवारी १८ जुलै रोजी सकाळी १० वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.