अमळनेर तालुक्यातील पिंगळवाडे गावातील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील पिंगळवाडे येथील आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना दि. ३० रोजी सायंकाळी उघडकीस आली. मृत विद्यार्थी हा नंदुरबार जिल्ह्यातील रहिवासी आहे. या प्रकरणी मारवड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तालुक्यातील पिंगळवाडे येथील आश्रमशाळेत सायंकाळची हजेरी घेताना पहिलीचा विद्यार्थी पंकज जमादार वळवी (वय ७ वर्ष, रा.केलीपाणी ता. तळोदा जि. नंदुरबार) हा दिसत नसल्याचे लक्षात आल्याने सर्वत्र शोधाशोध सुरू झाली.(केसीएन) त्यावेळी सदर मुलगा शाळेच्या बाजूला असलेल्या अतुल शरद पाटील यांच्या शेतातील विहिरीत पडल्याचे लक्षात आले. मात्र त्याचे प्रेत वर तरंगत असल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याचे दिसले.
पोलिसांना कळवून गावकऱ्यांनी खाटेला दोर बांधून विहिरीत सोडून सदर विद्यार्थ्याचा मृतदेह बाहेर काढला. रात्री उशिरा शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी भरत कोळी याच्या फिर्यादीवरुन मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पीएसआय राहुल बोरकर हे करीत आहेत.