पाचोरा शहरातील हनुमान नगर येथे घटना
पाचोरा (प्रतिनिधी) : स्नानगृहात अंघोळीसाठी गेलेल्या ४४ वर्षीय फर्निचर कारागीराला विद्युत हिटरचा जोरदार शॉक लागल्याने त्याचा मृत्यू ओढवला. ही घटना पाचोरा शहरातील हनुमान नगर परिसरात घडली. या प्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

धनराज सुखदेव मिस्तरी (वय ४४, रा.ए-वन काट्याजवळ, हनुमान नगर, पाचोरा) असे मृताचे नाव आहे.मृत धनराज मिस्तरी यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि दोन बहिणी असा परिवार आहे. धनराज मिस्तरी हे ११ तारखेला सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे घरातील बाथरूममध्ये अंघोळीसाठी गेल्यानंतर बाथरूममध्ये लावलेल्या वॉटर हिटरला स्पर्श झाल्याने त्यांना जोराचा विद्युत शॉक बसल्याने ते जागीच मृत झाले.
बेशुद्धावस्थेत कुटुंबीयांनी तातडीने त्यांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणी करून धनराज मिस्तरी यांना मृत घोषित केले. या अचानक घडलेल्या घटनेमुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल संदीप राजपूत करीत आहेत. प्राथमिक तपासात वॉटर हिटरच्या विद्युत प्रवाहामुळे ही दुर्घटना घडल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
धनराज मिस्तरी हे फर्निचर काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांचा स्वभाव अत्यंत शांत, मनमिळाऊ असल्याने व अचानक झालेल्या निधनामुळे हनुमान नगरसह परिसरात शोककळा पसरली.









