जळगावात नूतन मराठा महाविद्यालयातील घटना
सतीश कोळी (वय १९) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो नूतन मराठा महाविद्यालयाजवळ वसतिगृहात राहत होता. तो अनाथ असल्याची माहिती त्याच्या मित्रांनी दिली आहे. सकाळी त्याने महाविद्यालयामध्ये पार्किंग परिसरात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या पाठीवर दप्तर तसेच होते. आत्महत्या करण्यापूर्वी सतीश कोळी याने इंस्टाग्राम अकाउंटवर स्टेटस ठेवत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. सकाळी काही विद्यार्थ्यांच्या लक्षात ही घटना येताच महाविद्यालय प्रशासन व पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा पेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.