जळगाव शहरात खान्देश सेंट्रल परिसरात घटना ; गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील एका महिला महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला गेल्या काही दिवसांपासून मोबाइलवर संपर्क साधून त्रास देणाऱ्या एका रिक्षाचालकाला गुरुवारी दि. १७ जुलै रोजी नागरिकांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात आले. या रिक्षाचालकाने विद्यार्थिनीला रिक्षात बसवून खान्देश सेंट्रल मॉलमध्ये नेत तिच्याशी अंगलट करण्याचा प्रयत्न केला होता. पीडितेच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील एका महिला महाविद्यालयात शिक्षण घेणारी २० वर्षीय तरुणी गेल्या काही दिवसांपासून एका रिक्षाचालकाच्या त्रासाला कंटाळली होती. रिक्षाचालक तिला वारंवार मोबाइलवर संपर्क साधून त्रास देत होता. मुलीने आपले लग्न ठरले असल्याचे सांगूनही संशयिताकडून त्रास सुरूच होता, मात्र सुरुवातीला मुलीने त्याकडे दुर्लक्ष केले. गुरुवारी दुपारी १२.३० वाजता कॉलेज सुटल्यावर पीडित विद्यार्थिनी बाहेर येताच, रिक्षाचालक संशयित सलमान अहमद निजाम (वय २४, रा. गेंदालालमील) याने तिला रिक्षात (एमएच.१९.सी.डब्ल्यू.१६५२) बसवले. त्यानंतर तिला कोर्ट चौकमार्गे खान्देश सेंट्रल मॉलमध्ये घेऊन जाऊन तिच्याशी अंगलट करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार परिसरातील काही तरुणांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ त्या रिक्षाचालकाला हटकले. पीडित तरुणीची चौकशी केली असता, तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर नागरिकांनी तातडीने शहर पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन रिक्षाचालक सलमान अहमद निजाम याला ताब्यात घेतले. पीडित तरुणीने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.