भुसावळ ( प्रतिनिधी ) – के. नारखेडे माध्यमिक विद्यालय, तापी नगर, यावल रोड, येथे “संवाद समाजाशी” या उपक्रमांतर्गत दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी मार्गदर्शन कार्यशाळा पार पडली.
या कार्यशाळेत डॉ. राहुल भोईटे, वरणगाव, डॉ. प्रीती पाटील, जळगाव, डॉ. सचिन देशपांडे जळगाव आणि डॉ. नितीन धांडे, जळगाव या तज्ज्ञांनी “अभ्यासाच्या सवयी” (Study Habits) या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला व त्यांना त्यांच्या अभ्यासाच्या प्रवासात दिशादर्शक ठरणारे मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. सुमारे १६० विद्यार्थ्यांनी विशेष प्रश्नावली भरून दिली, ज्याच्या सखोल विश्लेषणातून त्यांना त्यांच्या अभ्यासपद्धतीत सुधारणा करता येणार असून, हा अनुभव त्यांच्या शैक्षणिक आयुष्यात मोलाचा ठरणार आहे.
कार्यशाळेत विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिकच नव्हे, तर वैयक्तिक शिस्त, वेळेचे व्यवस्थापन, आणि आत्मविश्वास वाढवणाऱ्या सवयींचीही जाणीव करून देण्यात आली. संवादाच्या ओघात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना अतिशय मनोपूर्वक उत्तरे दिली गेली, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा सहभाग अधिकच वाढला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. झोपे सर, शिक्षिका श्रीमती. संगीता अडकमोल, तसेच श्री. जोगी सर आणि श्री. पाठक सर यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यशाळेनंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आत्मविश्वास आणि प्रेरणा स्पष्टपणे जाणवत होती.
“शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर योग्य सवयींचा विकास ही खरी गुरुकिल्ली आहे,” हे या उपक्रमातून अधोरेखित झाले.