जळगाव (प्रतिनिधी)- कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या पुण्यतिथी निमित्त दरवषी ३ डिसेंबर रोजी लेवा गणबोली दिन साजरा करण्यात येतो. यावर्षीही विद्यापीठात भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्रात समूह चर्चा अंतर्गत लेवा गण बोली दिन साजरा करण्यात आला.
यावेळी प्रशाळेचे संचालक प्रा. डॉ. म.सु. पगारे यांनी अध्यक्षस्थानी होते. प्रशाळेतील प्राध्यापक व संशोधक विद्यार्थ्यांनी अहिराणी, लेवा गण बोली, तावडी अशा बोलीवर सखोल व सविस्तर चर्चा केली. बहिणाबाईच्या कविता या अहिराणी आहेत की लेवा गण बोली मध्ये आहेत? असा संभ्रम अजूनही साहित्यिकांमध्ये आणि अभ्यासकांमध्ये दिसून येतो. बहिणाबाईच्या कविता हया लेवा गणबोली मध्येच असून त्यात तत्वज्ञानाचा समावेश सर्वाधिक दिसतो असा चर्चेचा सूर होता. प्रा. डॉ. म.सू. पगारे यांच्या मते लेवा गण बोली ही स्वयंभू बोली असून तिची स्वतंत्र ओळख आहे. बहिणाबाई चौधरो यांनी आपल्या कवितेतून ज्या बोलीचा वापर केला ती लेवा गणबोली आहे. आहिराणी बोली जरी खानदेशात मोठ्या प्रमाणात बोलली जात असली तरी लेवा बोलीने आपली स्वतंत्र ओळख टिकवून ठेवली आहे. खान्देशात जवळपास २४ बोली बोलल्या जातात त्यातील एक महत्त्वाची बोली म्हणजे लेवा गण बोली आहे. परंतु, काही अभ्यासक जाणीवपूर्वक अभ्यासकांमध्ये गैरसमज पसरवून लेवा गण बोलीचे अस्तित्व नाकारत आहेत. जशी आहिराणी, तावडी तशीच लेवा गण बोली आहे हे नाकारून चालणार नाही. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष होणारी आक्रमणे भाषेच्या बाबतीत चुकीची असतात. समूह संख्येने अल्प असला तरी बोली भाषा ही टिकली पाहिजे. तिचे संवर्धन झाले पाहिजे, बोली भाषा जगल्या पाहिजेत, त्यासाठी बोली भाषेची संमेलने झाली पाहिजेत, बोली भाषेची चर्चा झाली पाहिजे असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी प्रशाळेतील प्राध्यापक डॉ. सुदर्शन भवरे, डॉ. दिपकरा संदानशिय, प्रतिभा गालवाडे, डॉ. प्रिती सोनी, डॉ. भारती सोनवणे व संशोधक विद्यापी खेमराज पाटील, महेश सुर्यवंशी नाईक यांनी लेवा गणोलीवर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार खेमराज पाटील यांनी केले.









