जळगाव (प्रतिनिधी) :- दिव्यांगाचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी व त्यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी ३ डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याच दिनाच्या अनुषंगाने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिसरातील योगेश्वर पाटोल, सामाजिकशास्त्रे प्रशाळा व महेश सूर्यवंशी, भाषा अभ्यास प्रशाळा यांचा सन्मान भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्राचे संचालक प्रा.डॉ. म.सु. पगारे यांच्या हस्ते करण्यात आला
बुध्दीच्या सामर्थ्यांवर दिव्यांग मात करीत असतात त्यामुळे त्यांच्या शारीरिक व्यंगत्याकडे न बघता त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे असते दिव्यांगाचा बाऊ न करता सतत कार्यशील राहून उच्च शिक्षण घेणे हे ध्येय असावे, असा मोलाचा सल्ला योगेश्वर पाटील यांनी यावेळी दिला. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ.म.सु पगारे म्हणाले की, दिव्यांग म्हणजे अपूर्णता नव्हे ती एक असाधारण शक्ती आहे. सरकारने दिव्यांगाना दिलेल्या सोयी सुविधांचा फायदा अपंग नसलेले स्वार्थी लोक करून घेतात ही खंत त्यांनी ह्यावेळी व्यक्त केली म्हणूनच खरे दिव्यांग व त्यांच्या गरजा ओळखून त्यांना सुविधा देणे सरकारची जबाबदारी आहे व त्यासाठी समाजही सजग झाला पाहिजे असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
या सन्मान सोहळयाप्रसंगी प्रशालेतील प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार खेमराज पाटील यांनी केले.









