जळगाव (प्रतिनिधी) :– महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग, यांचेकडील संदर्भ क्र. 1 वरील दिनांक 25 जानेवारी, 2022 रोजीचे परिपत्रकान्वये, राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालये, अभिमत विद्यापीठे, स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे, तंत्रनिकेतने व तत्सम शैक्षणिक संस्थामधील नियमित वर्ग दिनांक 1 फेब्रुवारी, 2022 पासून ऑफलाईन पध्दतीने सुरु करण्याबाबत मान्यता देण्यात आलेली असल्याने विद्यापीठ प्रशाळेतील व विद्यापीठाशी संलग्नित जिल्हयातील सर्व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यासाठी नियमित वर्ग प्रत्यक्षरित्या (ऑफलाईन) सुरु करण्यास परवानगी देणे, विद्यापीठातील व विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांना त्यांची वसतिगृहे विद्यार्थ्यासाठी खुली करणे व विद्यापीठ / महाविद्यालयातील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 100% उपस्थितीबाबत परवानगी देणेबाबत संदर्भ क्र. 2 वरील अर्जान्वये आपणा इकडील कार्यालयास विनंती केलेली आहे.
संदर्भ क्र.1 वरील परिपत्रकातील मुद्दा क्र.1 मध्ये जिल्हयातील विद्यापीठ व संलग्निता महाविद्यालये ही ज्या आयुक्त महानगरपालिका / नगरपालिका किंवा जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे अंतर्गत येतात, त्यांच्याशी कोविड- 19 च्या आजाराचा स्थानिक पातळीवरील प्रादुर्भाव स्थानिक परिस्थिती, प्रतिबंधित प्रक्षेत्राचे नियोजन व आरोग्यविषयक पायाभूत सुविधांची उपलब्धता या बाबी विचारात घेवून विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालये सुरु करण्याबाबत विचारविनिमय करुन योग्य तो निर्णय संबंधित विद्यापीठाने त्यांचेस्तरावर घ्यावा व त्यानुसार महाविद्यालयांना ऑफलाईन पध्दतीने नियमित वर्ग सुरु करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना/ मानक प्रणाली (SOPs) देणेबाबत सूचित केलेले आहे.
त्या अनुषंगाने जिल्हयातील कोविड -19 विषाणूच्या ओमिक्रॉन ( Omicrin) या नविन प्रकारच्या विषाणूचा प्रादुर्भाव / संसर्गाची स्थानिक परिस्थिती विचारात घेवून जळगाव जिल्हयातील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव विद्यापीठ प्रशाळेतील व विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्य्यिता विद्यापीठे, तंत्रनिकेतने, व तत्सम शैक्षणिक संस्थामधील विद्यार्थ्यांसाठी नियमित वर्ग प्रत्यक्षरित्या (ऑफलाईन) दिनांक 1 फेब्रुवारी, 2022 पासून खालील अटी व शर्तीस अधिन राहून सुरु करण्यास परवानगी देण्यात येत आहे.
ज्या गावात ॲक्टिव रुग्णांची संख्या दहापेक्षा कमी आहे अशा गावातील महाविद्यालये सुरु करावेत, ज्यांनी कोविड -19 च्या लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत, अशा विद्यार्थी / विद्यार्थीनींना विद्यापीठ व महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची परवानगी राहील, तथापि लसीकरण ( दोन्ही डोस ) न झालेल्या विद्यार्थी / विद्यार्थींनींना प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार नाही. त्यांना ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी.
विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयाच्या परीक्षा विद्यापीठ अनुदान आयोग व राज्य शासनाच्या धोरणानुसार घेण्यात याव्यात, महाविद्यालयात कोणत्याही खेळाच्या स्पर्धा, क्रिडा स्पर्धा,, स्नेहसंमेलने, सामुहिक विद्यार्थी नृत्य, कोणत्याही प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम घेता येणार नाहीत, विद्यापीठ / महाविद्यालयात वर्ग खोल्यांमध्ये योग्य ते शारिरीक अंतर ठेवून विदयार्थ्यासाठी बैठक व्यवस्था करण्यात यावी.
प्राध्यापकांचे सभा कार्यशाळा, शिक्षण परिषदा शक्यतोवर ऑनलाईन घ्याव्यात. ऑफलाईन स्वरुपात किंवा एकत्रित गर्दी जमा होईल अशा प्रकारचे कोणतेही कार्यक्रम सभा, संमेलने, परिषदा घेण्यात येवू नयेत, ज्या विद्यार्थी / विद्यार्थीनीनी कोविड -19 ची लस घेतलेली नाही. त्यांच्याकरिता विद्यापीठाने संबंधित संस्थांचे प्रमुख / महाविद्यालयांचे प्राचार्य यांचे मदतीने स्थानिक आरोग्य विभागाशी संपर्क साधून लसीकरणासाठी विशेष मोहिम राबवून लसीकरण प्राधान्याने पूर्ण करुन घ्यावे. तसेच आपल्या विद्यापीठातील / संलग्नित महाविद्यालयातील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे देखील लसीकरण प्राधान्याने पूर्ण करुन घ्यावे.
विद्यापीठातील व संलग्नित महाविद्यालयातील वसतिगृहात विद्यार्थी / प्राध्यापक यांना ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत त्यांनाच प्रवेश राहील, विद्यापीठातील व संलग्नित महाविद्यालयातील वसतिगृहाचा परिसर व खोल्यांचे निजंर्तुकीकरण करुन घेण्यात यावे, विद्यापीठातील व संलग्नित महाविद्यालयातील वसतिगृहाच्या प्रवेशव्दाराजवळ सॅनिटाईजर व हात धुण्याची व्यवस्था करण्यात यावी. मास्कचा वापर करणे आवश्यक राहील, जळगाव जिल्हयातील विद्यापीठ व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयांनी कोविड – 19 च्या व्यवस्थापनाबाबतचे राष्ट्रीय निर्देश, कामाच्या ठिकाणांबाबतचे अतिरिक्त निदेश, राज्य शासनाने वेळोवेळी दिलेली मार्गदर्शक तत्वे किंवा मानक कार्यप्रणाली (SOPs), विद्यापीठ अनुदान आयोगाने तसेच जिल्हा प्रशासनाकडून कोविड-19 चे व्यवस्थापनाबाबत निर्गमित केलेले आदेश / मार्गदर्शक सूचना लागू राहतील.
उपरोक्त दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188,269,270 आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 व फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.