जळगाव महानगरपालिकेसह शनिपेठ पोलीस स्टेशनचा सहभाग
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील विद्यालयाने महाविद्यालयाच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणे बंदी असताना देखील गुटखाजन्य पदार्थ विक्री करताना आढळल्यामुळे शहरातील चौबे शाळेच्या परिसरातील ६ पानटपऱ्यांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. महानगरपालिकेसह शनिपेठ पोलीस स्टेशनने ही धडक कामगिरी केली आहे.
शहरातील शैक्षणिक संस्थांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणे हे बंदी आहे. त्यामुळे सदरहू पान टपऱ्यांवर कारवाई करण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनुसार शाळा परिसरामध्ये मंगळवारी दि. १७ डिसेंबर रोजी दंडात्मक कारवाई करण्यात आलेली होती.(केसीएन)तरीदेखील या पान टपऱ्या सुरूच ठेवल्याने गुरुवारी दि. १९ रोजी सकाळी १० वाजता शनिपेठ पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या संयुक्त पथकाने शाळा आणि महानगरपालिका शाळा क्रमांक १७ या शाळांच्या १०० मीटर परिसरात असलेल्या ६ पान टपरी चालकांवर कारवाई केली. या पान टपऱ्या कायमस्वरूपी हटवून ताब्यात घेण्याची कारवाई मनपाने केली आहे.
पुढील दोन दिवसात इतरही पान टपरी चालकांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या कारवाईमध्ये इकबाल शेख उस्मान शेख (रा. इस्लामपुरा), शंकर लिंगा गवळी (रा. गवळीवाडा), भिका लिंगा गवळी (रा.गवळीवाडा), गणी मोहम्मद डिगी (रा. भीलपुरा) हे चौबे शाळेजवळील (केसीएन)तर मनपा शाळा क्रमांक १७ येथील बळीराम पेठ परिसरातील प्रकाश नामदेव पाटील (रा. बळीराम पेठ), अब्दुल करीम शेख इसा (रा. काट्याफेल, जळगाव) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय साजिद मंसूरी, पीएसआय योगेश ढिकले, हेड कॉन्स्टेबल युवराज कोळी, विजय खैरे, गिरीश पाटील, नाईक भागवत शिंदे, विकी इंगळे, पाटील, अनिल कांबळे तसेच महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे अधिकारी संजय ठाकूर आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे.