चोपडा तालुक्यातील खेडीभोकरी जि.प. शाळेत विद्यार्थ्यांचा उत्साह
चोपडा (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेच्या खेडीभोकरी प्राथमिक शाळेत दिनांक २२ ते २८ जुलै दरम्यान शिक्षण सप्ताह साजरा करण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन अध्यापन साहित्याचे वाचन, लेखन केले. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान दिवस अंतर्गत गणित पेटी, भाषा पेटी लेखन पूर्वतयारी व गणन पूर्वतयारी करून घेणे, भौमितिक आकृत्या काढणे यांचा सराव करण्यात आला.
क्रीडा दिवस अंतर्गत लिंबू चमचा व इतर पारंपरिक खेळाचे आयोजन करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत देशभक्ती गीतगायन व वेशभूषा सराव करून दिव्यांग विद्यार्थ्यांचाही समावेश करून घेतला. कौशल्य विकास अंतर्गत मातीकाम अंतर्गत मातीचे गणपती बनवणे, मातीचे बैल बनवणे, मातीचे खेळणे तयार करणे असे उत्कृष्ट कलाकृतींना चालना देणारा उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये प्रणव रतिलाल बाविस्कर यांनी सुंदर गणपतीची मूर्ती तयार करून आणली तर शालेय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरणाचे महत्त्व पटवून देण्यात आले व वृक्षदिंडीच्या आयोजन करून जनजागृती करण्यात आली झाडे लावा झाडे जगवा अशा घोषणा देण्यात आल्या.
मातीकाम या उपक्रमांतर्गत राजवीर अमोल कोळी, धनुष करम चंद पाटील, समर्थ विठ्ठल कोळी यांनी उत्कृष्ट कलागुण सादर केले. क्रीडा स्पर्धेत अश्विन मुलसिंग बारेला, प्रणव प्रवीण पाटील, मोहित सुनील पाटील, पुष्पराज संदीप पाटील यांनी चांगली कामगिरी केली. यावेळी रूही रवींद्र पाटील, प्राची लक्ष्मण धनगर, मानसी राहुल सैंदाणे, देवयानी सोपान सोनवणे, सृष्टी महेंद्र पाटील, कुणाल भगवान पाटील, कुणाल वाघ तर दिव्यांग विद्यार्थी ऋषिकेश वाघ व ज्ञानदीप महाले यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
शिक्षण सप्ताहाचे आयोजन करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी अविनाश पाटील व केंद्रप्रमुख वैशाली पाटील, परीक्षित चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापक भास्कर पाटील यांनी मार्गदर्शन केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी रमेश शिरसाठ, रोहिदास कोळी, विक्रम बोरसे यांनी परिश्रम घेतले.