एरंडोल ( प्रतिनिधी ) – अध्ययन साधना विदवत्तेकडे नेते आणि विदवत्ता समाजात प्रतिष्ठा प्राप्त करून देते विदवत्ता समाजमनावर आपली ओळख अधोरेखित करून जाते. आपली अशी ओळख आपणच निर्माण करा असे आवाहन एरंडोल येथील लेक वाचवा अभियानाचे पुरस्कर्ते प्रा वा ना आंधळे यांनी समस्त लाड वंजारी समाज एरंडोलतर्फे आयोजित विद्यार्थी व यशस्वी बांधवांच्या गुणगौरवप्रसंगी केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपालिकेचे मुख्याधिकारी विकास नवाळे होते पंचायत समितीचे अभियंता सागर वंजारी, नपा लेखापाल विक्रम घुगे, समाज अध्यक्ष विठ्ठल आंधळे, दामोदर वाघ, संतोष वंजारी, माजी नगराध्यक्षा वैशाली आंधळे हे मान्यवर यावेळी उपस्थित होते.
शिक्षण हे सागराप्रमाणे आहे त्यातून मोती घ्यायचे की मासे घ्यायचे हे निश्चित करा. ध्येयवेडे झाल्याशिवाय उद्दिष्टापर्यंत पोचता येत नाही असे वा.ना आंधळे यांनी सांगितले. या समारंभात 14 गुणवंत विद्यार्थी व 13 यशस्वी बांधवांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कोरोणायोद्धानाही गौरवण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात मुख्याधिकारी विलास नवाळे यांनी प्रतिकूलता आणि संघर्ष यातूनच मानवी आयुष्याला आकार मिळतो असे सांगून भरभरून प्रेरणा दिल्यात. सागर वंजारी व संतोष वंजारी यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त केले.
या समारंभाच्या यशस्वीतेसाठी विठ्ठल आंधळे, बबन वंजारी, रघुनाथ वंजारी, दीपक वंजारी, प्रविण वंजारी, शिवाजी वंजारी, गोपाल आंधळे, विलास वंजारी, जितेंद्र वंजारी, दिलीप वंजारी, अक्षय वंजारी, हर्षल आंधळे यांनी परिश्रम घेतले.







