जळगाव शहरात गोलाणी मार्केट येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : सोशल मीडियावरील इन्स्टाग्रामवर पाठवलेल्या मेसेजनुसार अॅप उघडून शेअर्समध्ये जास्तीचा नफा मिळवण्यासाठी गुंतवणूक केल्याने खासगी फायनान्स बँकेच्या रिलेशन मॅनेजरची १२ लाख ८२ हजार रुपयांत फसवणूक झाल्याचे समोर आले. या मॅनेजरला तब्बल ३ कोटी ९१ लाख रुपयांचा नफा झाल्याचे दाखवण्यात आले होते. याबाबत सायबर पोलिस ठाण्यात सोमवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.
संभाजी ढोमण माळी (वय ३५, रा. गुडुराजा नगर) हे गोलाणी मार्केटमधील जना स्मॉल फायनान्स बँकेत रिलेशन मॅनेजर आहेत. इन्स्टाग्राम प्लॅटफॉर्मवर ते १४ ऑगस्ट रोजी शेअर मार्केटचे व्हिडिओ रिल पाहत असताना गुंतवणुकीसाठी इच्छुक असाल तर पेज फॉलो करा असा मेसेज वाचून त्याला फॉलो केले. त्यानंतर NOMURA LGZ P84 या व्हॉट्सअॅप ग्रुपला त्यांना जोडण्यात आले. ग्रुप अॅडमीन नेहा अय्यर यांनी मेसेज टाकुन स्वागत केले. त्यासोबत शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा होईल, असे सांगण्यात आले. १८ ऑगस्ट रोजी लिंक पाठवून त्यावर क्लिक करण्यास सांगितले. ते केल्यावर माळी यांचे खाते उघडले. तसेच प्राजक्त सामंत नावाच्या व्यक्तीने दुसरी लिंक पाठवून त्यातील Nomuinsec हे अॅप डाऊनलोड करून त्यात मोबाइल नंबर, पासवर्ड व कोड टाकून कसे लॉगिन करायचे याचे ऑनलाइन मेसेजद्वारे मार्गदर्शन केले. त्यानंतर फंड ट्रान्स्फर करायला सांगितले.
संभाजी माळी यांनी २८ ऑगस्ट, ५ आणि १४ सप्टेंबर या तीन दिवशी ४० ते ५० हजार रुपये गुंतवले. त्यावर नफा झाल्याचे भामट्यांनी दर्शवले. त्यामुळे १५ सप्टेंबरला दोन वेळा करून ५ लाख ४७ हजार एवढी रक्कम गुंतवली. त्यानंतर २३ तारखेला ५ लाख ९५ हजार रक्कम गुंतवली होती. १२ लाख ८२ हजार रुपये गुंतवणूक केल्यावर माळी यांना ३ कोटी ९१ लाख २४ हजार ७९२ रुपये नफा झाल्याचे दाखवण्यात आले. तेव्हा त्यांनी ही रक्कम काढण्यासाठी अॅपमध्ये रिक्वेस्ट पाठवली असता, ती रिजेक्ट करून कमिशन म्हणून ३७ लाख रुपये देण्यास भामट्याने सांगितले. फसवणूक झाल्याचे माळी यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी २४ सप्टेंबर रोजी नॅशनल सायबर पोर्टलला तक्रार केली. त्यानंतर जळगाव येथील सायबर पोलिसांत सोमवारी प्रत्यक्ष जाऊन तक्रार केली. या प्रकरणी पुढील तपास जळगावच्या सायबर शाखेचे पोलिस निरीक्षक सतीश गोराडे हे करीत आहे.