नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) – झारखंड विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी नमाजसाठी खोल्या उपलब्ध करून दिल्यानंतर आता बिहारमध्ये भाजप आमदाराने विधानसभेत हनुमान चालिसा वाचण्यासाठी परवानगी मिळावी अशी मागणी केली आहे.
आता नमाजविरुद्ध पूजा असा वाद रंगताना दिसत आहे. बिहारचे भाजप आमदार हरी भूषण ठाकूर बचौल यांनी झारखंडमधील सोरेन सरकारचा निर्णय तुगलकी असल्याचा सांगत आता आम्हालाही बिहार विधानसभेत हनुमान चालिसा वाचण्यासाठी परवानगी हवी आहे, अशी मागणी केली आहे. काही दिवसांपासून झारखंड विधानसभेने मुस्लीम आमदारांना विधानसभेत काही खोल्या उपलब्ध करून दिल्यामुळे मोठा वादंग झाला आहे. या निर्णयाला भाजपकडून मोठा विरोध केला जात आहे.
माजी मुख्यमंत्री रघुवर दास यांनीही झारखंड सरकारवर टीका केली आहे. आता या निर्णयाचे लोण बिहार विधानसभेत पहायला मिळत आहे. बिहारमध्ये भाजप आणि जनता दल युनायटेडचे सरकार आहे. त्यामुळे आता हा मुद्दा बिहारमध्ये तापण्याची चिन्हं आहेत.
बिहारचे भाजप आमदार हरी भूषण ठाकुर बचौल यांनी ही मागणी करताना पुढे म्हटलं आहे, की ज्या पद्धतीने नमाजसाठी वेळ दिला जात आहे, आता तेवढाच वेळ आम्हालाही हनुमान चालिसा वाचण्यासाठी विधानसभेत हवा आहे. त्यासाठी आम्हाला आवश्यक वेळ दिला जावा ही आमची मागणी आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. भाजप आमदार हरी भूषण ठाकूर बचौल हे याआधीही आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहीलेले आहेत, याआधी त्यांनी बिहारमध्ये लोकसंख्या
नियंत्रण कायदा लागू करण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर मुस्लिमांच्या वाढत्या लोकसंख्येला आवर घालण्याचीही मागणी केली होती.