मुंबई ( प्रतिनिधी ) – विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून महाविकास आघाडी सरकारला धक्का बसत आहे. या निवडीसाठी आवाजी पद्धतीने मतदान घेण्यास राज्यपालांनी विरोध दर्शवला आहे. अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी आज अर्ज भरायचा होता. परंतु, आता राज्यपालांच्या भूमिकेमुळे राज्य सरकारसमोर नवा पेच निर्माण झाल्याचं दिसत आहे.
राज्यपालांच्या या निर्णयामुळे आता अध्यक्षपदाची निवडणूक रेंगाळण्याची परिस्थिती आहे. काल महाविकास आघाडीच्या वतीने मंत्री बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे व छगन भुजबळ यांना या निवडणुकीसंदर्भात पत्र सादर करून, परवानगी देण्याची विनंती केली होती. त्यावर आज राज्यपालांकडून सरकारला पत्र पाठवून उत्तर कळवण्यात आलं आहे.
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक खुल्या पद्धतीने घेण्यासाठी नियमात बदल करण्यात आला होता. मात्र हा नियम बदलण्यासाठी करण्यात आलेली प्रक्रिया घटनाबाह्य असल्याचे राज्यपालांनी राज्य सरकारला कळवलं आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत पेच निर्माण झाल्याचं दिसत आहे.
राज्यपालांच्या या उत्तरानंतर आता महाविकास आघाडीकडून राज्यपालांना तिसरं पत्र पाठवलं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या अगोदर मुख्यमंत्र्यांनी दोन शिफारस पत्रे पाठवलेली आहेत. तर, आता तिसऱ्या पत्रात ज्या कायदेशीर बाबींवर राज्यपालांकडून शंका उपस्थित केली जात आहे, त्याबाबत सविस्तर मुद्दे मांडले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.