हाडांचा ठिसूळपणा, संधिवात, सांधेदुखीविषयी डॉक्टरांकडून मोफत मार्गदर्शन
जळगाव (प्रतिनिधी) : येथील विचार वारसा फाउंडेशनतर्फे शिवनेरी हॉस्पिटलच्या सहकार्याने हाडांचा ठिसूळपणा व कमकुवतपणा या विषयावर भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबिरामध्ये २१५ नागरिकांनी सहभाग घेऊन आरोग्याविषयी माहिती जाणून घेतली.
सुरुवातीला डॉ. शंतनू भारद्वाज यांचा आरोग्यसेवेबद्दल सन्मान करण्यात आला. यानंतर सर्व वयोगटातील नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली. यामध्ये हाडांचा ठिसूळपणा, कमकुवतपणा, संधिवात, कंबरदुखी, पाठदुखी, सांधेदुखी, थकवा इत्यादी आजारांबाबत नागरिकांनी तपासणी केली. या वेळेला आवश्यक रुग्णांना मोफत औषधींची व्यवस्था करण्यात आली होती. तर काही नागरिकांची मोफत फुल बॉडी स्कॅन करण्यात आली.
प्रसंगी हाडांचे आरोग्य निरोगी कसे ठेवावे याबाबत डॉ. शंतनू भारद्वाज यांनी माहिती दिली. विचार वारसा फाउंडेशनचे अध्यक्ष विशाल देशमुख यांनी नागरिकांच्या निरामय आरोग्यासाठी दर महिन्याला आरोग्य तपासणी शिबिर घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी नगरसेवक आशुतोष पाटील, अभेद फाउंडेशन अध्यक्ष वैशाली झाल्टे,जगतगुरु महिला बचत गट अध्यक्ष अलका देशमुख, मंगला मराठे,देवका हरणे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन तुळजाई फाउंडेशनचे अध्यक्ष भूषण लाडवंजारी यांनी केले. कार्यक्रमासाठी अक्षय गवई, निखिल शेलार, राहुल सोले, संकेत म्हस्कर, प्रफुल सुर्यवंशी, मंगेश मांडोळे, मयुर डांगे आदींनी परिश्रम घेतले.









