भुसावळ तालुक्यातील घटना : मुंबई येथे सुरु होते उपचार
भुसावळ प्रतिनिधी- येथील रेल्वे विभागाच्या झेडटीएसमध्ये प्रशिक्षणादरम्यान विषबाधा होऊन उपचार घेत असलेल्या कर्मचाऱ्याचा मुंबई येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी भुसावळ शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

योगेश बबनराव नागवे (वय ३२, रा. शिव सोसायटी प्लॉट, पनवेल, नवी मुंबई) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव असून त्यांचे भुसावळ येथे प्रशिक्षण सुरू होते. या प्रशिक्षणादरम्यान २ जानेवारी रोजी सुमारे १५० कर्मचाऱ्यांना विषबाधेमुळे उलट्यांचा त्रास झाला होता. त्यानंतर नागवे यांच्यावर भुसावळ येथील रेल्वे रुग्णालयात उपचार करण्यात आले. प्रकृतीत थोडी सुधारणा झाल्यानंतर ते घरी परतले होते. पुन्हा उलट्यांचा त्रास वाढल्याने त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती अधिक खालावल्याने पुढील उपचारासाठी मुंबईतील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र १५ जानेवारी रोजी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी डॉक्टरांचा अहवाल आल्यानंतर शहर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









