इच्छादेवी चौकातील सिलिंडर स्फोट प्रकरण
जळगाव (प्रतिनिधी) :- वाहनामध्ये अवैधरित्या गॅस भरताना काही दिवसांपूर्वी सिलिंडरचा स्फोट होऊन गंभीररित्या जखमी झालेला वाहन चालक संदीप सोपान शेजवळ (वय ४५, रा. वाघनगर) यांचा मुंबई येथे उपचार घेत असताना रविवारी सायंकाळी मृत्यू झाला. यामुळे या दुर्घटनेत मृतांची संख्या तीन झाली आहे. ८ जखमींवर पुणे तसेच जळगाव येथे उपचार सुरू आहेत.
रिफिलिंग सेंटर चालक दानिश शेख (वय ४६, रा. जळगाव) यांचा गुरुवारी रात्री मुंबई येथे उपचार घेताना मृत्यू झाला होता. त्यानंतर शनिवार,
९ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास भरत सोमनाथ दालवाले (वय ५५, रा. जळगाव) यांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. स्फोटातील जखमी चालक संदीप शेजवळ यांना अधिकच्या उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असताना आज सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. ही वार्ता कळताच शेजवळ कुटुंबियांच्यासह त्यांच्या नातेवाईकाना जबर धक्का बसला. संदीप हे वाहन चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आई तसेच भाऊ असा परिवार आहे. वाघनगरात या घटनेनंतर हळहळ व्यक्त होत आहे. या स्फोटात भरत दालवाले यांच्यासह पत्नी, तसेच दोन मुले जखमी झाले आहेत. त्यात भरत दालवाले यांचा शनिवारी मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी हेमा, मुलगा सुरज (वय २३) तसेच लहान मुलगा देवेश (वय १९) या तिघांवर शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दालवाले कुटुंबियांचे पुणे येथील नातेवाईक संजय गणेश दालवाले, प्रतिभा दालवाले, रश्मी दालवाले यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू आहेत. अन्य दोघांनाही उपचारार्थ दाखल केले आहे.