जेसीआय जळगाव सेंट्रलच्या अध्यक्षपदी अंजली गादिया; नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात
जळगाव ( प्रतिनिधी ) – वेळेचे आणि कौशल्याचे योग्य नियोजन हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे. जेसीआय जळगाव सेंट्रलच्या नवीन टीमने सामाजिक बांधिलकी जपत संस्थेची उंची अधिक वाढवावी,” असा विश्वास रजनीश कटारिया यांनी व्यक्त केला.

शहरात सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या जेसीआय जळगाव सेंट्रल संस्थेची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. संस्थेच्या अध्यक्षपदी ॲड. अंजली गादिया यांची तर सचिवपदी गौरव कोगटा यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. शनिवारी पार पडलेल्या दिमाखदार पदग्रहण सोहळ्यात संस्थेची धुरा पहिल्यांदाच एका महिला अध्यक्षाकडे सोपवण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी रजनीश कटारिया यांनी आपल्या भाषणातून नवनियुक्त कार्यकारिणीला मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, “बदलत्या काळात महिलांकडे नेतृत्वाची धुरा येणे ही समाजात होत असलेल्या सकारात्मक बदलाची नांदी आहे. जेसीआय जळगाव सेंट्रलच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला अध्यक्ष होणे ही गौरवास्पद बाब आहे.” आयुष्याचे व्यवस्थापन कसे करावे यावर त्यांनी विविध उदाहरणासह मुद्दे नमूद केले.
नवीन कार्यकारिणीचा पदभार
पदग्रहण सोहळ्याची सुरुवात माजी अध्यक्ष अभिलाष राठी यांनी केली. त्यांनी मागील वर्षभरात राबवलेल्या विविध उपक्रमांचा आणि कार्याचा आढावा सादर केला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते नवीन पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकारी अध्यक्षपदी ॲड. अंजली गादिया, सचिव गौरव कोगटा, उपाध्यक्ष अर्पित बेहेडे, खजिनदार मोनिका ओस्तवाल, एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर अक्षय गादिया, अथांग पारख, पीपी समन्वयक वेणुगोपाल झंवर यांच्यासह कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
या सोहळ्याला सौरभ गट्टाणी आणि कृष्णन बजाज हे देखील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनीही आपल्या मनोगतातून नवीन टीमला शुभेच्छा दिल्या. जेसीआय जळगाव सेंट्रलच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलेकडे नेतृत्वाची धुरा आल्याने संस्थेत मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. पदग्रहण सोहळ्यानंतर शहराच्या सामाजिक वर्तुळातून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे कौतुक होत आहे.









