जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव तालुक्यातील कानळदा येथील माहेर असलेल्या विवाहितेला डंपर घेण्यासाठी माहेरहून ५ लाखांची मागणी करत छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भात गुरुवार १५ डिसेंबरला जळगाव तालुका पोलीस स्टेशनला पतीसह सासरच्या मंडळी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जळगाव तालुक्यातील कानळदा येथील माहेर असलेल्या भावना पंकज कोळी (वय-२२) यांचा विवाह २०१९ मध्ये एरंडोल तालुक्यातील सावदा येथील पंकज गुलाब कोळी यांच्याशी रीतीरिवाजानुसार झाला. दरम्यान काहीही कारण नसताना तिला उपाशीपोटी ठेवून शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच माहेरहून डंपर घेण्यासाठी ५ लाखांची मागणी केली. विवाहितेने पैशांची पूर्तता न केल्यामुळे तिचा अधिक छळ सुरू झाला. हा छळ सुरू असताना सासरच्या मंडळींनी देखील पैशांसाठी तगादा लावला. अखेर विवाहिता कंटाळून माहेरी निघून आल्या. दरम्यान या प्रकरणी गुरुवारी १५ डिसेंबर रोजी विवाहितेने जळगाव तालुका पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून पती पंकज गुलाब कोळी, सासरे गुलाब लक्ष्मण कोळी, सासू संगीता गुलाब कोळी, दीर सागर गुलाब कोळी, चुलत जेठाणी छाया सुनील कोळी सर्व रा. सावदा, ता. एरंडोल, जि. जळगाव यांच्या विरोधात जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक दीपक कोळी करीत आहे.