पाचोरा तालुक्यातील सार्वे येथील घटना
पाचोरा (प्रतिनिधी) : तालुक्यातील सार्वे येथे एका प्रौढाचा विजेच्या वायरचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी दि. २ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरु होते.
राजेंद्र शांताराम पाटील (वय ५०, रा. सार्वे ता. पाचोरा) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. ते सार्वे गावात भाऊ, पत्नी, १ मुलगा, १ मुलगी यांच्यासह राहत होते. राजेंद्र पाटील हे भारतीय सैन्य दलात सैनिक आहेत. (केसीएन) सोमवारी ते गावात असताना अचानक वीज गेली. त्यावेळी वायरमुळे विजेचा धक्का लागल्याने ते दूर फेकले गेले. कुटुंबीय व नागरिकांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले.
यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. प्रसंगी नगरदेवळा दूरक्षेत्र पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती जाणून घेतली. पाचोरा पोलीस स्टेशन येथे घटनेची नोंद घेण्याचे काम सुरु होते. सैनिक राजेंद्र पाटील यांच्या मृत्यूमुळे सार्वे गावावर शोककळा पसरली आहे.