नवी मुंबई;- नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमधील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मसाला मार्केटमधील हॉटेलमध्ये काम करणा-या कोरोनाबाधित वेटरच्या संपर्कात आलेल्या ६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आता एपीएमसीमधील कोरोना रुग्णाची संख्या १२ वर पोहोचली आहे.
पहिल्यांदा एपीएमसी मार्केटमध्ये एका भाजीपाला मार्केटमधील व्यापा-याला आणि फळ मार्केटमधील सुरक्षा अधिका-याला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर २८ एप्रिलला एपीएमसी धान्य मार्केटमधील एका व्यापा-याला कोरोनाची लागण झाली. कोरोनाबाधित होणा-या व्यापारी धान्य मार्केटच्या ‘जी’ विंगमध्ये व्यापार करत होता. हा व्यापारी कोपरखैराणेमधील रहिवासी आहे. याआधी ‘एल’ विंगमधील व्यापा-याला कोरोनाची लागण झाली होती. त्यासोबत मसाला मार्केटमधील व्यापा-याला, एका हॉटेल कर्मचा-याला आणि त्याच्या संपर्कात आलेल्या ६ जणांचा कोरोनाची लागण झाली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एपीएमसी प्रशासनाने मार्केटच्या प्रवेशद्वाराबाहेर सोशल डिस्टन्सिंगसाठी बॅरिकेट्स लावले आहेत. प्रवेशद्वारावर सॅनिटाईझ करुन गाड्यांना आत प्रवेश दिला जात आहे. मात्र, मार्केटच्या आत प्रवेश केल्यावर व्यपारी आणि ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे सोशल डिस्टनसिंग येथे पाळला जात नसल्याने कोरोना रुग्णामंध्ये वाढ होत आहे.