तांदूळवाडी येथे शेतकरी मेळावा, पाणीवापर संस्था प्रशिक्षण संपन्न
भडगाव / चाळीसगाव (प्रतिनिधी) :- वरखेडे लोंढे मध्यम प्रकल्पास मुळ प्रशासकीय मान्यता दि.०१ मार्च १९९९ रोजी मिळाली. मात्र सन २०१४ पर्यंत प्रकल्पाचे काम संथगतीने सुरु होते. सन २०१४-१५ मध्ये प्रकल्प पूर्णत्वास आणण्यासाठी तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना केल्या व प्रकल्पास ०९ मार्च २०१८ रोजी द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली. तद्नंतर प्रकल्पाचा समावेश केंद्र शासन व राज्य शासन यांच्या संयुक्तपणे अर्थसहाय्यक बळीराजा जलसंजीवनी योजनेमध्ये ०१ जानेवारी २०१९ रोजी समावेश करण्यात आला. यानंतर खऱ्या अर्थाने धरणाच्या बांधकामाला गती आली. अखेर प्रकल्पांतर्गत असलेल्या मुख्य धरणाचे (बॅरेजचे) काम मार्च २०२१ रोजी पूर्ण झाले. नियोजित क्षेत्र ८२९० हे. यामध्ये चाळीसगांव तालुक्याचे २० गावे ५६८७ हेक्टर आणि भडगांव तालुक्याचे ११ गावे २६०३ हेक्टर क्षेत्र सिंचनासाठी प्रस्तावित आहेत.
वरखेडे-लोंढे बॅरेज मध्यम प्रकल्पासाठी पारंपारिक स्वरूपाचा खुला कालवा प्रस्तावित होता. मात्र यात पाणी गळतीचे प्रमाण लक्षणीय आहे. महाविकास आघाडी सरकार असताना तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी बंदिस्त पाटचारीचा प्रस्ताव नाकारला व हा प्रकल्प व्यवहार्य नाही असे लेखी पत्र दिले. मात्र २०२२ मध्ये भाजपा सेना महायुती सरकार येताच या प्रकल्पाला तत्काळ मंजुरी मिळाली. आमच्या मागणीनुसार व शासनाच्या नविन धोरणानुसार अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले पाईपलाइन प्रणालीद्वारे सिंचन या पर्यायाचा अवलंब करण्यात येत असून येत्या २ वर्षात केवळ चाळीसगावच नव्हे तर भडगाव तालुक्यातील लाभक्षेत्रातील शेवटच्या शेतकऱ्याच्या बांधावर पाणी पोहोचविण्यासाठी आम्ही सर्व लोकप्रतिनिधी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन चाळीसगाव मतदारसंघाचे आ. मंगेश चव्हाण यांनी केले. ते तांदूळवाडी ता.भडगाव येथे वरखेडे धरण लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचा मेळावा व पाणीवापर संस्था प्रशिक्षण प्रसंगी बोलत होते.
यावेळी खा. स्मिताताई वाघ, आ. किशोर पाटील, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अधिक्षक अभियंता संतोष भोसले, जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळ यशवंत भदाणे, जळगाव मध्यम प्रकल्प विभाग क्र.२ चे कार्यकारी अभियंता कामेश पाटील, वरखेडे लोंढे उपविभाग शाखा अभियंता किरण तायडे यांच्यासह बाजार समिती सभापती मच्छिंद्र राठोड, पोपट भोळे, रावसाहेब पाटील, संतोष भोसले, धर्मा आबा वाघ, संजय तात्या पाटील, डॉ. विशाल पाटील, विकास पाटील, शेषराव बापू पाटील, सुनील जमादार, मंगेश (मुन्नाबापू) पाटील, सुभाष पाटील, सुनील निकम, नितीन पाटील, बापूसाहेब निकम, नवल पवार, कपिल पाटील, रवींद्र पाटील, साहेबराव राठोड, विजय दिनकर पाटील, सरपंच दीपक चव्हाण, सीमचे उपसरपंच ज्ञानेश्वर महाजन, तुषार चव्हाण, दादाभाऊ पाटील, दिलीप चव्हाण, वाल्मीक बोरसे, अनिल पाटील, राहुल पाटील, अनिल महाजन, गिरीश बराटे, काशिनाथ शिरसाठ, सचिन चव्हाण, सोनू भाऊ धनगर, ज्ञानेश्वर चव्हाण, सुरेश महाराज, शिवदास महाजन यांसह वरखेडे धरण लाभक्षेत्रातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर मेळावा प्रसंगी चाळीसगाव व भडगाव तालुक्यातील वरखेडे धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या वतीने आ. मंगेश चव्हाण व किशोर पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांच्या विविध शंकांचे निरसन व नवीन मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली. आ. चव्हाण यांनी मनोगतात पुढे सांगितले की, जुन्या पारंपारिक पद्धतीने पाटचारी झाली असती तर किमान ६ वर्ष फक्त भूसंपादन, पुढील ४ वर्ष बांधकाम असे किमान १० वर्ष पाणी बांधापर्यंत येण्यासाठी लागले असते.याकाळात पारंपारिक कालव्याची ७०० कोटी किंमत दुप्पटीने म्हणजे १४०० कोटी इतकी वाढली असती. यासोबतच धरणाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या तामसवाडी गावाचे जोपर्यंत पुनर्वसन होत नाही तोपर्यंत धरणाचे काम होऊ देणार नाही अशी ग्रामस्थांची भूमिका होती, यातून मार्ग काढत त्यांच्या मागणीनुसार मालेगाव रोड येथे तामसवाडी गावाच्या पुनर्वसनासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली.
या बुडीत क्षेत्राचे भूसंपादन, तामसवाडी पुनर्वसन, गिरणा नदीवर मोठे व छोटे वरखेडे गावाला जोडणारा पूल यासह संपूर्ण प्रकल्प १०० टक्के कार्यान्वित होण्यासाठी १२७५ कोटींची तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता येत्या २ आठवड्यात देण्याचा शब्द जलसंपदामंत्री ना. गिरीश महाजन यांनी आपल्याला दिला असल्याची माहिती आ. चव्हाण यांनी दिली.
सदर शेतकरी मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांनी मनोगताच्या माध्यमातून उपस्थितांशी संवाद साधला. सदर बंदिस्त पाटचारी कामात माझा जरी खारीचा वाटा असला तरी यामध्ये सिंहाचा वाटा आ. मंगेश चव्हाण यांचा आहे. येत्या २ वर्षात प्रत्यक्षात हे पाणी शेत शिवारात खेळेल मात्र महायुती सरकारच्या माध्यमातून केवळ हाच प्रकल्प नव्हे तर गिरणा खोऱ्याला संजीवनी ठरणारा नार – पार नदीजोड प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आमचा पाठपुरावा सुरु राहणार आहे. प्रत्येक लोकसभा निवडणुकीच्या वेळी गिरणा नदीवर बलून बंधारे बांधण्यासाठी हेलिकॉप्टरने हवाई पाहणी व गिरणा परिक्रमा करून जनतेची दिशाभूल करण्याचे काम केले गेले मात्र बलून बंधारे हवेतच राहिले. जे व्यवहार्य आहे आणि करता येणे शक्य आहे तेच आश्वासन लोकांना द्यावे हे मानणारा मी कार्यकर्ता आहे, २५० कोटींच्या बलून बंधाऱ्यांची किंमत आता १२०० कोटीपर्यंत गेली याच्या २५ टक्के खर्चात व कमी वेळेत गिरणा नदीवर पारंपारिक पद्धतीचे १० बंधारे बांधता येतील. त्यामुळे यापुढे बलून बंधारे नावावर राजकारण न होऊ देता कमी खर्चात व कमी वेळेत होणारे पारंपारिक बंधारे होण्यासाठी आमचा पाठपुरावा राहणार असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले.
तापी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता भदाणे साहेब यांनी प्रस्ताविकाच्या माध्यमातून तसेच सेवानिवृत्त अभियंताहिरे व राष्ट्रविकास अग्रो एज्युकेशन संस्था अमळनेर चे सचिव तुषार पाटील यांनी लाभक्षेत्रात उभारण्यात येणाऱ्या पाणीवापर संस्था यांची माहिती शेतकऱ्यांना दिली.सदर बंदिस्त पाटचारी योजनेला पाईपलाइन जमिनीच्या खालून /अंडरग्राऊंड प्रस्तावित असल्याने भुसंपादन करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे संबंधीत भुधारकांचे जमिनीचे क्षेत्र कायम राहणार आहे. भूसंपादनास लागणारा वेळ व निधी वाचणार. सुमारे ४०० हेक्टर गिरणा पट्टयातील उपजाऊ जमिनीची बचत होईल. पाईपाचे खोदकाम करताना होणारे पिकाचे पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात येत आहे.पाईपाचे खोदकाम व पाईपलाईन बुजवल्यानंतर या ठिकाणचे संबंधीत भुधारकाच्या शेतीचे पोत खराब होऊ नये यासाठी काळी माती आणून व अंथरवून पोत योग्य पूर्ववत करून देण्याची तरतूद या कामामध्ये अंर्तभुत आहे.
बंदिस्त पाटचारी प्रकल्पात एकाचवेळी संपूर्ण लाभंक्षेत्रात पाणी देता येईल. यामध्ये पाणी योग्य दाबाने सर्व क्षेत्रास शेवटपर्यंत मिळण्याचे नियोजन असेल.पाणी पाईपलाईन मध्ये सोडल्यानंतर त्यात गाळ कचरा राहू नये या करिता ठिकठिकाणी नदी आणि नाल्यालगत स्कोअर व्हॉल्वची तरतूद करण्यात आलेली आहे.तसेच पाण्याचा दाब नियंत्रित ठेवण्यासाठी व पाईपातील हवा बाहेर निघण्यासाठी एअर Valves ची तरतूद ठेवण्यात आलेली आहे.
वरखेडे धरणाच्या लाभक्षेत्रात सहकार तत्वावर चालणारी “पाणी वापर संस्था” स्थापन करण्यात येईल. प्रत्येकी ३०० ते ४०० हेक्टर भागासाठी एक पाणी वापर संस्था याप्रमाणे संस्था निर्माण करण्यात येणार आहेत. चाळीसगाव तालुक्यात २० व भडगाव तालुक्यात ९ पाणीवापर संस्था पाणी वितरण काम सुलभरित्या होण्यासाठी व वेळोवेळी पाणी वापर संस्थेचे बैठकी होणेसाठी व पुढील नियोजन करण्यासाठी पाणी वापर संस्थांची इमारत बांधकाम करण्यात येईल. पाणी मोजण्यासाठी वॉटर मीटर बसवण्यात येतील.सदर योजना पूर्ण झाल्यानंतर पाच वर्षे परिचलन, देखभाल आणि दुरूस्ती हे संबंधीत कंत्राटदारास करावयाचे आहे.सर्व लाभार्थी शेतकरी यांना प्रशिक्षण देखील देण्यात येईल आणि त्यामध्ये बंद नलिका वितरण प्रणालीचा वापर करण्याचे मार्गदर्शन मिळेल.पाणीवापर संस्था निर्मिती झाल्याने पाणीपट्टी मध्ये सुमारे ५०% सवलत मिळू शकते अशी माहिती त्यांनी दिली.