भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील घटना
भुसावळ ( प्रतिनिधी ) – वरणगाव रेल्वे स्टेशन परिसरात मध्यरात्री दिड वाजेच्या सुमारास घडलेल्या हृदयद्रावक घटनेत सागर (वैभव) दिलीप कोळी (वय २५, रा. कोळीवाडा, वरणगाव) या तरुणाचा मालवाहू रेल्वेच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. भुसावळ रेल्वे लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


सागर कोळी हा मंगळवारी रात्री सुमारे दीड वाजेच्या सुमारास वरणगाव रेल्वे स्टेशन परिसरात आला होता. त्याचवेळी भुसावळकडून येणाऱ्या मालवाहू रेल्वेने स्टेशनपासून दादरा परिसराच्या काही अंतरावर त्याला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात सागरचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच भुसावळ-लोहमार्ग रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला.
मृतदेह शवविच्छेदनासाठी भुसावळ येथे पाठवण्यात आला असून या प्रकरणी अशोक पुंडलीक कोळी रा. वरणगाव यांचे खबरीवरून भुसावळ लोहमार्ग पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे कोळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विशेष बाब म्हणजे, सुमारे आठ ते नऊ वर्षांपूर्वी सागरच्या भावाचाही याच ठिकाणी रेल्वे अपघातात मृत्यू झाला होता.
रेल्वेने प्रवास करत असताना पाय घसरून तो रेल्वेखाली सापडल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. सागरच्या पश्चात आई-वडील व एक बहीण असा परिवार असून कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. सागर हा कष्टाळू, मनमिळावू आणि सर्वांना मदतीला धावून जाणारा तरुण म्हणून परिसरात परिचित होता. त्याच्या अकाली निधनाने वरणगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.









