दीड वर्षांपूर्वीच अग्निशमन दलात झाला होता रुजू
जळगाव (प्रतिनिधी):- नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर पडलेल्या एका उमद्या तरुणावर काळाने घाला घातला आहे. वापी (गुजरात) येथील अग्निशमन विभागात कार्यरत असलेल्या जळगाव तालुक्यातील भोकर येथील प्रफुल्ल सुनील पाटील (वय २२) या तरुणाचा भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला. या घटनेमुळे भोकर गावावर शोककळा पसरली असून पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
प्रफुल्ल पाटील हा गेल्या दीड वर्षांपासून वापी येथील अग्निशमन दलात आपली सेवा बजावत होता. मंगळवारी (दि. १७ मार्च) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास आपली ड्युटी संपवून तो खोलीवर परतला होता. जेवण झाल्यानंतर शतपावली करण्यासाठी तो बाहेर पडला असता, भरधाव वेगाने आलेल्या एका अज्ञात वाहनाने त्याला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, प्रफुल्लचा जागीच मृत्यू झाला.


प्रफुल्ल हा अत्यंत मेहनती आणि जिद्दी युवक होता. घराची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी त्याने वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी अग्निशमन विभागात नोकरी मिळवली होती. त्याचे वडील सुनील पाटील हे भोकर येथे शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. प्रफुल्लच्या निधनाने कुटुंबाचा मोठा आधार हिरावला गेला आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ आणि आजी असा परिवार आहे.









