वनरक्षकाच्या मृत्यूने हळहळ, मुक्ताईनगर येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- मुक्ताईनगर येथे वनविभागात कार्यरत असलेले वनरक्षक सोमवारी संध्याकाळी ड्युटी आटोपून घरी परतल्यावर त्यांना अचानक छातीत दुखायला सुरुवात झाली. त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने जळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र मंगळवारी १० ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एका हसत्याखेळत्या व्यक्तीचे, तंदुरुस्त असताना अचानक हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबियांसह सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.
बापूसाहेब भिका थोरात (वय ४९, रा. राजाराम नगर, कानळदा रोड, जळगाव) असे मयत इसमाचे नाव आहे. ते वनविभागात २०१० पासून वनरक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यांचा परिवार जळगावात राहतो. तर ड्युटी मुक्ताईनगर येथे असल्याने तेथेच खोली घेऊन ते राहत होते. सोमवारी ९ ऑक्टोबर रोजी त्यांची दिवसाची ड्युटी होती. ती आटोपल्यावर संध्याकाळी ते खोलीवर आले असता काही वेळानंतर त्यांना छातीत दुखायचा त्रास सुरु झाला.
त्यामुळे त्यांनी सहकाऱ्यांना सांगितले. त्यांनी तातडीने बापूसाहेब यांना जळगाव येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरु असताना सकाळी त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. यानंतर त्यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला होता. त्यांच्या मृत्यूची वार्ता कळताच कुटुंबीयांनी प्रचंड आक्रोश केला. यावेळी त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या आठवणींना वाट करून दिली. बापूसाहेब थोरात यांचे पश्चात आई, वडील, पत्नी, २ मुले, ३ भाऊ, काका असा मोठा परिवार आहे.