मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियानांतर्गत जिल्हाभरात ३८१ कामे पूर्ण
जळगाव (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये जलसंधारण हा महत्त्वपूर्ण घटक असून, त्या अंतर्गत वनराई बंधारे बांधण्याच्या उपक्रमाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.सोमवारी जिल्हाभरात ३८१ वनराई बंधाऱ्यांचे काम पूर्ण करण्यात आले.
याच उपक्रमांतर्गत आज, सोमवार दि. १३ ऑक्टोबर रोजी जळगाव तालुक्यातील रामदेववाडी येथे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकसहभागातून वनराई बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली. या उपक्रमात जिल्हा सायकलिस्ट असोसिएशनचे सदस्य, तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी. एस. अकलाडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विनोद चावरिया, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के, व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अभियंता राहुल जाधव उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी या वेळी सांगितले की, “वनराई बंधाऱ्यांमुळे जलसंधारण, भूजल पातळी वाढ, शेतीसाठी पाण्याची उपलब्धता आणि पर्यावरण संवर्धन या सर्व घटकांमध्ये सकारात्मक बदल होतो. ग्रामीण भागातील लोकांनी अशा उपक्रमात सक्रिय सहभाग घेतल्यास जलसंपत्ती टिकविणे व सशक्त ग्रामविकास साध्य होऊ शकतो.” हा उपक्रम लोकसहभागातून राबविलेल्या विकासाच्या आदर्श मॉडेलपैकी एक ठरला असून, जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या समन्वयातून ग्रामीण भागातील जलसंधारणासाठी कार्य करण्याचा संकल्प या उपक्रमाद्वारे दृढ करण्यात आला.