मुंबई (वृत्तसंस्था) – मुंबई येथील क्रुझवरील धाडी प्रकरणी पंचांनीच एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या विरोधात गंभीर आरोप केल्यानंतर वानखेडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्याअनुषंगाने त्यांना दिल्लीला बोलवण्यात आले असून त्यांची खात्यांतर्गत चौकशी होणार असल्याचे एनसीबीचे मुख्य अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितलं.
क्रुझवरील धाडीत पंच असलेल्या प्रभाकर साईल यांनी एक व्हिडीओ व्हायरल करून एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शाहरुख खानकडून 25 कोटींची मागणी करण्यात आली होती. त्यातील 8 कोटी रुपये वानखेडेंना मिळणार होते. आर्यन खानला सोडण्यासाठी ही डिलिंग होणार होती, असा दावा प्रभाकर साईल यांनी केला आहे. या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे एनसीबीच्या दिल्ली मुख्यालयाने या आरोपाची गंभीर दखल घेतली आहे.