पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने एलसीबीची धडक कामगिरी
जळगाव (प्रतिनिधी) :- जिल्ह्यात तसेच शहरात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई हाती घेतली आहे. या मोहिमेत गेल्या महिनाभरात विविध ठिकाणी छापेमारी करून एकूण ४ ट्रॅक्टर व १ ट्रक अवैध वाळूसह जप्त करण्यात आले असून, आरोपींवर गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई सुरू आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या चोपडा उपविभागातील पथकाने दि. १६ जुलै २०२५ रोजी चोपडा शहर पोलीस ठाणे हद्दीत अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर व ट्रॉलीसह आरोपीला ताब्यात घेतले. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला. दि. २४ जुलै २०२५ रोजी चाळीसगाव उपविभागाच्या पथकाने मेहुणबारे पोलीस ठाणे हद्दीत ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त केली. ही वाहने व आरोपी दंडात्मक कारवाईसाठी पोलीस ठाण्याकडे सोपवण्यात आले.(केसीएन)दि. ०७ ऑगस्ट रोजी जळगाव उपविभागातील पथकाने रामानंदनगर पोलीस ठाणे हद्दीतील गणपतीनगर परिसरात विनापरवाना वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालयाकडे हस्तांतर केला. दुसऱ्या दिवशी, दि. ०८ ऑगस्ट रोजी, जिल्हापेठ पोलीस ठाणे हद्दीतील मानराज पार्क राष्ट्रीय महामार्गावर (एमएच १९- २१९१) क्रमांकाचा टाटा कंपनीचा ट्रक अवैध वाळूसह ताब्यात घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात सुरक्षित ठेवण्यात आला.
पाचोरा उपविभागाच्या पथकाने ०७ ऑगस्ट रोजी भडगाव पोलीस ठाणे हद्दीत अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडून दंडात्मक कारवाईसाठी पोलिसांकडे दिला. गेल्या महिन्यात एकूण पाच वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, येत्या दिवसांत ही मोहीम आणखी तीव्र करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.ही कारवाई डॉ. महेश्वर रेड्डी (पोलीस अधीक्षक), अशोक नखाते (अपर पोलीस अधीक्षक, जळगाव भाग), कविता नेरकर (अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव भाग) यांच्या मार्गदर्शनाखाली, संदीप पाटील (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा) यांच्या नेतृत्वाखाली विविध उपविभागांच्या अधिकाऱ्यांनी व अंमलदारांनी केली.