भुसावळ येथील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) – अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या व्यक्तींवर आता जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी लक्ष केंद्रित केले आहे. भुसावळ येथील राष्ट्रीय महामार्गावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या एका वाहनाची जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी चौकशी केली.त्याच्याकडे परवाना नसल्याने त्याला पकडून भुसावळ तालुका पथकाच्या ताब्यात दिले.
जिल्हाधिकारी अमन मित्तल हे भुसावळ दौऱ्यावर आले होते. ते राष्ट्रीय महामार्गावर अपघात स्थळ पाहण्यासाठी जात असताना अशोक लेलँड कंपनीचे वाहन (क्रमांक एमएच १९ : सीवाय ३९५२) वाळू घेऊन जात होते. जिल्हाधिकाऱ्यांनी वाहन थांबवून त्याला गौण खनिज परवान्याची मागणी केली असता त्याच्याकडे गौण खनिज वाहतूक परवाना आढळून आला नाही. त्यावरून भुसावळ महसूल विभागाचे प्रभारी तहसीलदार अंगद असदकर यांना कारवाई करण्याचे निर्देश दिले. पथकाने केलेल्या कारवाईत सव्वा लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे.
तहसील कार्यालयातील पथक तलाठी पवन नवगाळे, मंडल अधिकारी प्रफुल्ल कांबळे, तलाठी मिलिंद तायडे, मंडल अधिकारी रजनी तायडे, कोतवाल जीतेश चौधरी यांनी हे वाहन ताब्यात घेऊन तहसल कार्यालयाच्या आवारात लावण्यात आले आहे. हे वाहन सीताराम सैनी यांच्या मालकीचे असून, त्यावर अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी सव्वा लाखाचा दंड आकारण्यात आल्याची माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली आहे.