चोपडा तालुक्यातील अडावद येथील घटना
चोपडा (प्रतिनिधी) – तालुक्यातील अडावद येथे वाळूने भरलेल्या भरधाव ट्रॅक्टरने पायी चालणाऱ्या ३० वर्षीय तरुणास जबर धडक दिली आहे. त्यात तो जागीच ठार झाला. ही घटना अडावद जवळ कृषी विद्यालयाजवळ रविवारी सकाळी ११:३० वाजता घडली आहे. अडावद पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.
राजेंद्र झिंगा धनगर ( सोनवणे ) ,(३० रा. कमळगाव ता. चोपडा) असे या मृत तरुणाचे नाव आहे. तो अडावद-चोपडा मार्गावरील कृषी विद्यालयाजवळ पायी निघाला होता. सकाळी वाळूच्या भरधाव ट्रॅक्टरने राजेंद्र यास जबर धडक दिली. यात त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने जागेवरच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी ट्रॅक्टरचालक रवींद्र विजय कोळी (२९, रा. सुटकार ता. चोपडा) यास वाहनासह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मृत राजेंद्र धनगर याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. अडावद पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.