राज्यभरातून स्पर्धकांचा सहभाग
जळगाव (प्रतिनिधी) : वाकोद येथील राणीदानजी जैन माध्यमिक व कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालयात जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड जळगावचे संस्थापक अध्यक्ष डॉ. भवरलाल जैन यांच्या पत्नी कांताबाई जैन यांच्या १९ व्या स्मृतिदिनानिमित्त राज्यस्तरिय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेकरिता मोठा प्रतिसाद मिळाला आहे. तीनही गटातून मोठ्या संखेने स्पर्धक सहभागी झाले होते. तीन गटात घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये पहिल्या गटातून लॉर्ड गणेशा इंग्लिश मिडीयम स्कूल जामनेर येथील नीरज दीपक पाटील तसेच दुसऱ्या गटामधून नि. प. पाटील माध्यमिक विद्यालय पळसखेडा मिरचे येथील राजवीर कैलास खरारे व मोठया गटामधून प्रताप माध्यमिक विद्यालय चोपडा येथील रोशनी देवीदास पाटील यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. हे स्पर्धेचे आठवे वर्ष आहे.
विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वाचा विकास व्हावा व त्यांचे एकंदर व्यक्तिमत्त्व प्रगल्भ व्हावे हा उदात्त हेतू स्पर्धेच्या आयोजनाचे आहे. मानवाला वाणीचे वरदान लाभले आहे. या वाणीद्वारे आपले ज्ञान इतरांपर्यंत पोहोचवण्याचे भाषण हे प्रभावी माध्यम आहे. म्हणून भाषण कलेचा विकास व्हावा हाच मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवला आहे. सकाळ सत्रात स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेचे उद्घाटन ज्ञानेश्वर शेंडे, किशोर कुलकर्णी, माजी प्राचार्य ए. टी. चौधरी, जैन फार्म वाकोद येथील व्यवस्थापक विनोदसिंह राजपूत यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेनंतर दुपार सत्रात बक्षिस वितरण समारंभ झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी ‘धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप सोसायटी लि. शेंदुर्णी’चे अध्यक्ष संजयदादा गरुड होते. व्यासपीठावर संस्थेचे सचिव सांगरमल जैन, उपसचिव यु. यु. पाटील, जैन उदयोग समुहाचे लेखक ज्ञानेश्वर शेंडे, पत्रकार किशोर कुलकर्णी, पोलीस पाटील संतोष देठे, संपर्क अधिकारी ए. ए. पटेल, मुख्याध्यापक एस. टी. चिंचोले, पर्यवेक्षक एन. टी. पाटील, कृषी विद्यालयाचे प्राचार्य डी. आर. चौधरीं, जैन फार्म व्यवस्थापक विनोदसिंह राजपुत, माजी मुख्याध्यापक व्ही. के. चौधरी उपास्थित होते. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे दूरदृष्टी प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.
ही स्पर्धा ५ वी ते ७ वी, ८ वी ते १० वी आणि युवा गट ११ वी, १२ वी अशा तीन गटात घेण्यात आली. त्यासाठी अनुक्रमे ‘मोबाईल खेळ – घातक व्यसन’, ‘पप्पा, कार नको संस्कार द्या!’ आणि ‘माझं कुटुंब, माझं संस्कारकेंद्र’ ‘शेतकरी नसेल तेंव्हा’, ‘शाश्वत विकास आणि पर्यावरण’ आणि ‘संस्काराची विद्यापीठे हरवलीत कुठे?’ हे विषय तर ‘आणखी किती निर्भया?’, ‘अरे मानसा मानसा, कधी होशील माणूस?’ आणि ‘खाजगी क्लासेसचा गोरखधंदा’ असे विषय स्पर्धेसाठी दिलेले होते. प्रत्येक गटातील प्रथम द्वितीय व तृतीय विजेत्या स्पर्धकास अनुक्रमे ५००१ रु ३००१ रु २००१ रु सोबत स्मृती चिन्ह व प्रमाण पत्र असे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत प्रत्येक गटातुन पहिले तीन क्रमांकाचे स्पर्धक निवडले गेले. यावेळी वक्तृत्व स्पर्धेत पहिल्या आलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणाचे सादरीकरण केले.
पाचवी ते सातवी – बाल गटात – नीरज दीपक पाटील (प्रथम) लॉर्ड गणेशा इंग्लिश मेडीयम स्कुल जामनेर, सृष्टी नरेंद्र महाजन (द्वितीय) प्रताप माध्यमिक विद्यालय चोपडा, पूर्वा ईश्वरलाल तवर (तृतीय) काकासाहेब पूर्णपात्रे माध्यमिक विद्यालय चाळीसगाव हे स्पर्धक ठरले. किशोर गटातून – राजवीर कैलास खरारे (प्रथम) नि. प. पाटील माध्यमिक विद्यालय पळसखेडा मिराचे, योगेश रणवीर साळुंखे (द्वितीय) काकासाहेब पूर्णपात्रे माध्यमिक विद्यालय चाळीसगाव, शरयू पांडुरंग थोरात (तृतीय) राणीदानजी जैन माध्यमिक विद्यालय वाकोद हे स्पर्धक विजय ठरले. युवा गटामध्ये रोशनी देविदास पाटील प्रताप माध्यमिक विद्यालय चोपडा व रोहिणी विनोद डोखळे (प्रथम) माध्यमिक विद्यालय वाकोद, साक्षी अनिल महाजन (द्वितीय) न्यू इंग्लिश स्कूल जामनेर, सुमित दीपक खैरे स्वामी विवेकानंद जुनियर कॉलेज शिवना (तृतीय) ठरले. सर्व विजेत्यांना मान्यवराच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.
या स्पर्धासाठी जैन इरिगेशनची सेवाभावी संस्था भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनशन यांचे अनमोल सहकार्य लाभले. यासाठी परीक्षकांच्यावतीने ज्ञानेश्वर शेंडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. बक्षिस वितरण समारंभाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक एन. टी. पाटील यांनी केले. यावेळी प्रमुख आतिथी म्हणून सागरमलजी जैन यांनी मार्गदर्शन केले. शैक्षणिक संस्थाचालक संजय गरुड यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले . सुत्रसचलन प्रा ए.बी. पाटील यांनी केले तर आभार स्पर्धा प्रमुख प्रा नितीन पाटील यांनी मानले.