वाकोद ( प्रतिनिधी ) – आगामी काळात होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी वाकोद आणि पंचक्रोशीतील युवकांसाठी भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन संचलित गौराई स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व अभ्यासिकेतर्फे मोफत मार्गदर्शन वर्ग प्रारंभ झालेला आहे. सदर मार्गदर्शन वर्ग शनिवार व रविवारी सकाळी दहा ते पाच या वेळात गौराई कृषी तंत्रनिकेतन या ठिकाणी संपन्न होणार आहे.
नुकतेच या ठिकाणी स्पर्धा परीक्षा तज्ञ देवलसिंग पाटील यांचे सामान्य विज्ञान या विषयावर मार्गदर्शन सत्र संपन्न झाले. ते म्हणाले की,सर्व परीक्षांसाठी विज्ञान हा विषय अत्यंत उपयुक्त आहे.तसेच आपण ज्या युगात जगत आहोत तो काळ विज्ञानाचा आहे.म्हणून तरुणांनी विज्ञान या विषयाशी मैत्री करावी असे ते म्हणाले.गौराई स्पर्धा परीक्षा केंद्र हे वाकोद पंचक्रोशीतील युवकांसाठी संजीवनी ठरणार आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.
सदर मार्गदर्शन वर्गासोबत विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका व ग्रंथालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे .पोलीस भरती ,सरळसेवा, सैन्यभरती,रेल्वे यासह पोलीस उपनिरीक्षक, राज्यकर निरीक्षक ,मंत्रालय सहाय्यक या पदांसाठी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे .स्पर्धा परीक्षा व अभ्यासाबाबत असणाऱ्या अडचणींबाबत समुपदेशनाची सुविधा देखील या केंद्रावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तरी विद्यार्थ्यांनी गौराई कृषी तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ.डी आर चौधरी तसेच विनोद सिंग राजपूत यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आलेले आहे.