चोपडा-शिरपूर रोडवर भीषण अपघात
चोपडा (प्रतिनिधी) – चोपडा ते शिरपूर या मार्गावरील काजीपुरा फाट्याजवळ समोरून भरधाव वेगाने आलेल्या एका अज्ञात दुचाकीने जोरदार धडक दिल्याने सुनील हिम्मत पाटील (वय ३०, रा. चोपडाई, ता. अमळनेर) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २८ नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा घडली. या अपघाताप्रकरणी मंगळवार, ९ डिसेंबर रोजी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनील पाटील हे २८ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास आपल्या दुचाकीने (एमएच ५४ ए ५४०७) चोपडा ते शिरपूर रस्त्यावरून काजीपुरा फाट्याजवळून जात होते. त्याच वेळी, समोरून वेगाने येणाऱ्या एका अज्ञात दुचाकीने त्यांच्या वाहनाला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, सुनील पाटील गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळले.अपघातानंतर सुनील पाटील यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाल्यामुळे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या अपघाती मृत्यूमुळे अमळनेर तालुक्यातील चोपडाई गावात शोककळा पसरली आहे. या घटनेनंतर सुनील यांचा भाऊ अमृत हिम्मत पाटील यांनी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. फिर्यादीनुसार, अज्ञात दुचाकी चालकाविरुद्ध निष्काळजीपणाने वाहन चालवून अपघाती मृत्यूप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत पारधी हे करीत आहेत.









