भडगाव तालुक्यातील नालबंदी फाट्याजवळ घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- भडगाव तालुक्यातील पळासखेडा गावाजवळ नालबंदी फाट्याजवळ भीषण अपघातामध्ये अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तरुण ठार झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. याबाबत भडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विकास किरण सोनवणे (वय ३४, रा. भडगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो शहरात परिवारासोबत राहतो. सोमवारी दि. १६ डिसेंबर रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास तो नालबंदी फाट्याजवळून जात असताना अज्ञात वाहनाने विकास सोनवणेच्या दुचाकीला (एमएच १९ डीपी ५९१०) जोरदार धडक दिली.
यात दुचाकीवरील विकास सोनवणे याच्या शरीराला जबर मार लागल्यामुळे तो जागीच ठार झाला तर त्याच्यासोबत असणारा तुकाराम जोगी हा गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर घटनेबाबत मदत विकास सोनवणे यांचे बंधू शिवाजी सोनवणे यांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.